लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी : कृषी खाते थेट शेतकऱ्यांशी निगडित असल्याने शेतकऱ्यांची कामे, मार्गदर्शनही वेळेत होणे गरजेचे असते; परंतु पुरंदर तालुका कृषी विभागात सुमारे ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने शेतकरी वर्गाची वेळेत कामे होत नसल्याने तक्रारी वाढू लागलेल्या आहेत. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी कर्मचारी भरले जाणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.पुरंदर तालुका कृषी विभागाचे सासवड येथे मुख्य कार्यालय आहे, त्या कार्यालयांतर्गत सासवड, जेजुरी, परींचे, पिसर्वे असे चार मंडल कृषी अधिकाऱ्यां ची कार्यालये आहेत. या चारही विभागातून संपूर्ण तालुक्यातील खेड्यांतील शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन होत असते. या विभागाचा शेतकऱ्यांचा दररोजचा संबंध येत असतो. मात्र, कर्मचारी अपुरे असल्याने शेतकऱ्यांच्या कृषी विभागाबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. अधिक माहिती घेतली असता पुरंदरच्या कृषी विभागाकडे सुमारे ३० टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. या विभागाकडे सासवड मुख्य कार्यालय आणि चारही मंडल कार्यालयांतून तालुका कृषी अधिकारी ते अगदी शिपाई या पदासाठी एकूण ८४ अधिकारी व कर्मचारी असायला हवेत. प्रत्यक्षात मात्र ६१ कर्मचारी कार्यरत असून, २३ कर्मचाऱ्यांच्या जागा रिकाम्या आहेत. यात कृषी अधिकारी २, कृषी पर्यवेक्षक २, कृषी सहायक ११, लिपिक पदे चार आहेत, चारही जागा रिक्त आहेत, अणुरेखक २, शिपाई २, ही पदे रिक्तअसल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येत आहे.
पुरंदरच्या कृषी विभागात तीस टक्के जागा रिक्त
By admin | Published: May 24, 2017 4:02 AM