वेल्हे : वेल्हे तालुक्यात सोळा गावांना टॅँकर देऊन पाणीपुरवठा करण्यात येत असून, ज्या गावांना पाण्यासाठी टॅँकरची मागणी आहे, अशा गावांनी लवकरात लवकर प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी केले आहे. तालुक्यातील फणशी, मेरावणे, लव्ही खुर्द, लव्ही बुद्रुक, पिंपरी, वाजेघर खुर्द, मेटपिलावरे दादवडी, वरोती, कुसार पेठ, गेळगणी, निवी, गेव्हंडे, खोपडेवाडी, रांजणे, टेकपोळे, कोशीमघर आदी गावांना नुकताच पाणीपुरवठा सुरू केला आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी साखर, पासली व रुळे येथील विहिरीचा आधार घेतला आहे. शासनाकडून सध्या वेल्ह्यात चार टॅँकर देण्यात आले असून, यामध्ये दोन ट्रक असल्याने त्यामध्ये एक हजार लिटरच्या टाक्या आहेत. या टाक्यामुळे पाणीवाटप करताना अडथळे निर्माण होत आहेत. टाक्यामधील पाणी काढण्यासाठी बराच वेळ जात आहे. त्यामुळे याचा परिणाम दुसरीकडे पाणीपुरवठा करण्यासाठी अडथळा येत आहे. यासाठी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, टॅँकरचालक यांची बैठक घेऊन पाणीपुरवठ्याबाबत सूचना दिल्या आहेत. उन्हाळा कडक झाल्याने सध्या गावोगावी पाण्याचे स्रोत आटत असताना दिसत आहेत. वेल्ह्यातसुद्धा पाणीटंचाई भीषण असल्याने गावोगावी लोकांना पाण्याच्या समस्याने ग्रासले आहे.(वार्ताहर)
वेल्ह्यातील सोळा गावे तहानलेली
By admin | Published: May 12, 2014 3:38 AM