पुणे : मैत्रिणींना फिरविण्याकरिता चार जणांनी तब्बल १६ दुचाकी चोरल्या. शहराच्या मध्यवस्तीतील दुचाकी चोरणाऱ्या या चौघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून एकूण ७ लाख रुपये किमतीच्या १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या चौघांपैकी एक जण ससून रुग्णालयात स्वच्छता कामगार म्हणून काम करीत होता.
किरण रमेश गालफाडे (२१, मंगळवार पेठ), सौरभ अनुद अठवाल २३, मंगळवार पेठ, नोकरी ससून हॉस्पिटल), लक्ष्मण शाम मोरे (२२, मंगळवार पेठ), सोनू धर्मेंद्र रजपूत (२५, मूळ राजस्थान, सध्या रा. भाजी मार्केट, लोहगाव, व्यवसाय-अंडाभुर्जी हातगाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्त घालत असताना पोलीस कॉन्स्टेबल अमेय रसाळ यांना किरण गालफाडे, सौरभ अठवाल, लक्ष्मण मोरे, सोनू रजपूत या चौघांनी शहर व परिसरातून दुचाकी चोरी केल्या असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चौघांनाही सापळा रचून वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी शहर व परिसरातून १६ दुचाकी वाहने चोरली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून फरासखाना पोलीस ठाण्यातील १०, बंडगार्डन २, भारती विद्यापीठ, खडक, विश्रामबाग, लोणीकंद पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे १६ गुन्हे उघडकीस आणले. त्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांनी ७ लाख रुपये किमतीच्या एकूण १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, त्यांच्याकडून वाहने घेणाºयांना पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत.
अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, कर्मचारी बापूसाहेब खुटवड, केदार आढाव, दिनेश भांदुर्गे, अमोल सरडे, विकास बोºहाडे, शंकर कुंभार, सयाजी चव्हाण, हर्षल शिंदे, महावीर वलटे, मोहन दळवी, आकाश वाल्मीकी व अमेय रसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.