Pune Metro:...हा तर पुणेकरांच्या जीवाशी खेळ" ‘महामेट्रो’ विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 10:24 AM2023-04-06T10:24:16+5:302023-04-06T10:24:46+5:30
मेट्रोस्थानक स्ट्रक्चरल उभारणीच्या सदोष कामाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर समाधानकारक स्पष्टीकरण नाही
पुणे: महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून मेट्रोस्थानक स्ट्रक्चरल उभारणीच्या सदोष कामाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने, तसेच कंपनीने केलेल्या दुरुस्त्या मान्य नसल्याने पुण्यातील स्ट्रक्चरल इंजिनिअर नारायण कोचक यांनी कंपनीविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
विविध रेल्वे कंपन्यांमध्ये अधिकारीपदावर काम केलेले पुण्यातील चार निवृत्त अधिकारी, हैदराबाद मेट्रो रेल लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. केतन गोखले, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट शिरीष खसबरदार आणि स्ट्रक्चरल इंजिनिअर नारायण कोचक यांनी पुण्यातील मेट्रो स्थानक स्ट्रक्चरचा दर्जा आणि सदोष डिझाइनबाबत काही निरीक्षणे नोंदवीत नाराजी व्यक्त केली होती. या आशयाची बातमी दि.१३ फेब्रुवारी रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. महामेट्रो कंपनीने त्रुटी असल्याचे मान्यही केले हाेते; पण मेट्रो स्थानकाचे स्ट्रक्चर सुरक्षित असल्याचा दावा केला. मात्र, महामेट्रोने स्पष्टीकरण समाधानकारक न वाटल्याने स्ट्रक्चरल इंजिनिअर नारायण कोचक यांनी कंपनीविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
कोचक यांनी ॲड. प्रतीक राजोपाध्येय, ॲड. आशिष पाटणकर, ॲड. निखिल डोंगरे आणि ॲड. अमेय रानडे यांच्यामार्फत ही जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. नारायण कोचक म्हणाले, ‘महामेट्रो कंपनीचे स्ट्रक्चर स्थिर असल्याबाबत प्रमाणपत्र दिल्याचे म्हणत आहे. त्यात त्यांनी केलेल्या दुरुस्त्या आम्हाला मान्य नाहीत. कमिशनर ऑफ मेट्रो अँड सेफ्टी यांना पाठविलेल्या पत्रातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. कंपनी बरीच माहिती सुस्पष्टपणे द्यायला तयार नाही. हा पुणेकरांच्या जिवाशी खेळ आहे, म्हणून ही जनहित याचिका दाखल केली आहे.