बारामती (पुणे) : अजित दादा हे त्यांच्या पद्धतीने काम करणारे नेते आहेत. त्यांनी त्यांच्या कामाची चुणूक अनेक वेळा मंत्रिमंडळामध्ये दाखवली आहे. त्यांना पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवावी लागणे हे दुर्दैव आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला.
शनिवारी (दि. २४) कार्यक्रमानिमित्त बारामती येथे आलेल्या बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादीमधील नाट्यमय घडामोडीनंतर मला असे वाटले होते की अजित पवार व छगन भुजबळ यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडतील. मात्र त्यांनी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडले. राष्ट्रवादीमध्ये ज्या नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. त्या केवळ मीडियाची स्पेस घेण्यासाठी व महाराष्ट्राला भूलथापा देण्यासाठी आहे. त्यामुळे तिथे भाकरी फिरवण्याची कोणालाही इच्छा नाही.
उद्धव ठाकरे यांना माझे आव्हान आहे. तुम्ही विधान मंडळाचे सदस्य आहात. विधान मंडळामध्ये तुम्ही पीएम केअर फंडाबाबत आवाज उठवावा. मागील अधिवेशनामध्ये तुम्ही काही बोलला नाही. तुम्ही एकच दिवस अधिवेशनामध्ये आला. तुम्हाला ठाणे नागपूर येथील महापौरांचा भ्रष्टाचार माहिती आहे. तर अधिवेशनामध्ये येऊन तुम्ही ते मांडायला हवे होते. सरकार त्याची चौकशी करेल. मात्र तुम्ही अधिवेशनामध्ये येणारच नाही. तुमच्या लेटर पॅड वर हे सरकारला सांगा ना, का नुसत्या तोंडाच्या वाफा फेकायच्या. तुमच्यात जर हिम्मत असेल तर विरोधी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही हा भ्रष्टाचार समोर मांडा. जर काही चुकीचे असेल तर सरकार त्यांच्यावर कारवाई करेल, असेही बावनकुळे म्हणाले.
पंकजाताईंच्या रक्ता-रक्तामध्ये फक्त कमळ...
पंकजाताई या गोपीनाथ मुंडे यांच्या सावलीमध्ये वाढल्या आहेत. त्यांच्या रक्तारक्तामध्ये कमळ आहे. त्या कधीही बीआरएस किंवा एमआयएम या पक्षांचा विचार देखील करू शकत नाहीत. हा महाराष्ट्र समजायला भाजपला चाळीस वर्षे लागली. पवार साहेबांना 84 वर्षे लागली. त्यामुळे बाहेरचा कोणीतरी येईल आणि मी हे करेल ते करेल असे सांगेल तर ते होणार नाही. कोणी बीआरएस आणि एमआयएम पंकजाताई यांच्याकडे जात असेल तर त्या दारात देखील उभे करणार नाहीत, असं बावनकुळे म्हणाले.
वैयक्तिक टीका करणार असाल तर आम्हाला निर्णय करावा लागेल...ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस व आम्ही कधीही उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका केली नाही. आदित्य हे सरकारमध्ये मंत्री होते विरोधी पक्ष म्हणून आम्हाला त्यांच्यावर टीका करणे गरजेचे होते. विरोधी पक्षांची टीका झेलण्याची तुमच्या क्षमता असायला हवी. आम्ही त्यांच्या कार्यक्षमतेवर टीका केली मात्र परिवारावर कधीही टीका केली नाही. परिवारावर टीका करायची असेल तर त्यांच्या एक हजार गोष्टी आमच्याकडे आहेत. ते देवेंद्र फडणवीस वर अशा पद्धतीने टीका करत असतील तर त्यांच्या बाबतीत आम्हाला निर्णय करावा लागेल आणि आम्ही तो लवकर करू.