पुणे: जगभरातलया विविध नद्या-खाडी-समुद्रात पोहणं अनेकांना आवडतं तर कमीत कमी वेळात एखादी खाडी पोहून पार करणं आणि विक्रम रचणं हे अनेकांचं स्वप्न असतं. असंच एक स्वप्न पूर्ण केलंय लंडनस्थित अवघ्या १६ वर्षाच्या प्रिशा टापरे हिने! तिने २१ मैलाचे अंतर (३४ किमी.) ११ तास ४८ मिनिटांत पोहून पार केले आहे. पुण्यातील वसंत टॉकिजचे विलास टापरे यांची ती नात आहे.
वसंत टॉकीजचे मालक विलास टापरे यांचे सुपुत्र राहुल टापरे यांची कन्या प्रिशा टापरे आहे. तिने कमी वयात इंग्लिश खाडी पोहून 'असाध्य ते साध्य' केले आहे. अनेक तरुण मुलींसाठी ती एक प्रेरणा आहे. वॅटफोर्डची प्रिशा 'इंग्लिश चॅनेल' पोहणारी सगळ्यात लहान मुलगी ठरली आहे. तिने ४ सप्टेंबर रोजी तिने हा नवा विक्रम रचला.
प्रिशाने आतापर्यंत पोहण्याच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. ती म्हणाली, की "पोहतांना मी कोणताच विचार करत नाही, मी माझ्या मेंदूला तशीच सवय लावली आहे. इंग्लिश चॅनेल पोहतांना सुरुवातीला थोडी भीती वाटली, अंधारात पोहायची मला सवय नव्हती, त्यामुळे दोन तास थोडे कठीण गेले, मग मात्र मी सरावले, पुढे पाणीदेखील शांत होतं. आपण पाण्यात ध्यानधारणा करतेय असा विचार मी केला. पोहणं हे माझ्यासाठी डोकं शांत करण्याचा एक मार्ग आहे." असंही ती सांगते. इंग्लिश खाडी पोहून मिळालेले पैसे प्रिशा एका सामाजिक संस्थेला दान करणार आहे. या संस्थेमार्फत भारत आणि युके मधील गोरगरीब मुलांना अन्नवाटप केले जाणार आहे.
माझा अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये, की मी 'इंग्लिश चॅनेल' पोहू शकले, पण मला छान वाटतंय, की मी ही कामगिरी पूर्ण करू शकले. ही तर फक्त सुरुवात आहे, असे अजून विक्रम मला रचायचे आहेत. मला माझ्यासारख्या इतर मुलींना या खेळात येण्यासाठी प्रेरित करायचंय. - प्रिशा टापरे