पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आज पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. 'घरातील सगळे वाद संपू दे, असं विठुरायाला साकड घातल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभरात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील असे स्पष्ट संकेत दिले आहेत. अजित पवार यांच्या आई आशा पवार यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना नवीन वर्ष सर्वांसाठी चांगले जावो असे म्हटले आहे. सर्व कौटुंबिक वाद संपले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांनी पुन्हा एकत्र यावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलतांना शरद पवार आणि अजित पवार यांनी पुन्हा एकत्र यावे या विधानांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आज २ ० ७ वा शौर्यदिन साजरा केला जात आहे. यामुळे कोरेगाव भीमा येथे अनुयायींनी मोठी गर्दी केली आहे. त्याचबरोबर राजकीय नेते देखील अभिवादनासाठी येत आहेत. कोरेगाव भीमा विजयस्तंभ येथे शौर्यदिनी रामदास आठवले यांनी अभिवादन केले.
यावेळी माध्यमांशी बोलतांना आठवले म्हणाले,'अजित पवार यांच्या मातोश्री यांनी पंढरपूरला साकडं घातल. आमची सुद्धा हीच इच्छा आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं. माझी अनेक दिवसांपासून इच्छा आहे पवार साहेबांनी एनडीए सोबत यावं, काँग्रेस पक्षापेक्षा महायुतीमध्ये येणं चांगल राहील.' असेही ते म्हणाले. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. लोकसभा निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात लढल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळालं आहे. या निकालानंतर राष्ट्रवादीमधील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. राष्ट्रवादी मधील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.