...हा त्रास १० लाख लोकांमध्ये एकाला होतो" अजित पवारांनी सांगितला ‘त्या’ प्रसंगाचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 02:24 PM2023-01-19T14:24:33+5:302023-01-19T14:24:43+5:30
विरोधी पक्षनेते अजित पवार यांना देखील काही वर्षांपुर्वी डोळ्याच्या रेटीनोचा आजार झाला होता
बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार यांना देखील काही वर्षांपुर्वी डोळ्याच्या रेटीनोचा आजार झाला होता. त्यावर डॉ.तात्याराव लहाने यांनी शस्त्रक्रिया करुन उपचार केले.हा आजार १० लाख लोकांमध्ये एकाला होत असल्याचे देखील यावेळी पवार यांनी सांगितले. बारामती येथील ऐन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडीयाच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात पवार यांनी हा किस्सा सांगितला.
यावेळी पवार म्हणाले, कधी कोणता प्रसंग कोणाच्या वाट्याला येईल, ते सांगता येत नाही. मागे मी एकदा परदेशात गेलो होतो.त्यावेळी परदेशात माझ्या डोळ्याला काहीतरी झाल्याचे जाणवले. मुंबईत मंत्रालयात असताना देखील डोळ्याचा त्रास जाणवला, त्यानंतर मी तातडीने डॉ.तात्याराव लहाने यांच्याकडे गेलो. डॉ. लहाने यांनी बॅटरीचा वापर करुन तातडीने डोळ्याची तपासणी केली. माझ्या डोळ्यातील रेटीनोला ‘प्रॉब्लेम’ झाल्याचे पवार त्यांनी सांगितले. त्या रेटीनोला लेजरने बांध घालून उपचार करण्यास त्यांनी सुचवले. त्यानंतर तातडीने डॉ.लहाने यांनी माझ्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली. हा आजार नेमका काय आहे, याची माहिती डॉ.लहाने यांना विचारली. त्यावर त्यांनी हा त्रास १० लाख लोकांमध्ये एकाला होतो, असे सांगितल्याची आठवण पवार यांनी या वेळी शिबीरात सांगितली.
यावेळी अजित पवार यांनी डॉ लहाने यांचे आरोग्य क्षेत्रात मोठे काम असल्याचे कौतुक केले. डॉ.लहाने यांना त्यांच्या कामामुळे खासदारकीची भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ऑफर दिली होती. मात्र, माझा तो पिंड नसल्याचे सांगत डॉ.लहाने यांनी त्यास नकार दिला. यामध्ये त्यांना त्रास झाला, याचा मी साक्षीदार आहे. केवळ त्यांचे चांगले काम असल्याने त्या प्रसंगातून डॉ. लहाने बाहेर पडल्याचे पवार म्हणाले.