पुणे: ‘ते माझ्याविषयी असे का बोलले मला माहिती नाही, मी पक्षात बचत गटापासून गेली अनेक वर्षे काम करते आहे. मला एखादे पद मिळाले असेल तर ते माझ्या कामाकडे पाहून दिले गेले आहे. त्याविषयी कोणी काही बोलत असेल तर ते फक्त असूयेतून बोलत आहेत’ अशा शब्दांमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी त्यांच्या टिकाकारांना कोणाचेही नाव न घेता प्रत्युत्तर दिले.
विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा ३ वर्षांसाठी फेरनियुक्ती करत असल्याचे पत्र दिले. त्यावर शहराध्यक्ष दीपक मानकर, महिला पदाधिकारी रुपाली पाटील ठोंबरे यांनी टीका केली. एकाच व्यक्तीला पक्षाकडून किती पदे दिली जाणार असा प्रश्न त्यांनी केला. त्याच बरोबर काही अनुचित वक्तव्यही केले गेले. त्याची चर्चा दिवसभर शहरात होती.
चाकणकर यांनी त्यांना शुक्रवारी कोणाचेही नाव न घेता प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, “पहिली नियुक्तीही पक्षानेच दिली होती. त्याहीवेळी अशीच टीका केली गेली. काहींनी तर दीडदीड वर्षे हे पद वाटून द्यावे असेही सुचवले. त्यांचे अज्ञानच यातून दिसते. हे पद घटनात्मक असते. त्याची मुदत ३ वर्षांची आहे. मागील काळात या पदावरून मी प्रामाणिकपणे काम केले. ते पाहूनच पक्षाने मला फेरनियुक्ती दिली. ते लक्षात न घेता टीका केली जात आहे, मात्र मी त्याला महत्व देत नाही.”
विधानपरिषदेच्या एकूण १२ जागा होत्या. त्यातील ३ जागा आमच्या पक्षाला मिळणार होत्या, मात्र फक्त २ मिळाल्या. ३ जागा असल्या असत्या तर त्या यादीत तिसरे नाव माझेच होते. आमदार म्हणूनही माझी निवड झाली असती.- रुपाली चाकणकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग