पुणे: यंदाचा उन्हाळा चांगलाच घाम फोडणार अशी शक्यता असून, मध्य भारतासह उत्तर व पश्चिम भारतात उष्णतेच्या लाटेचाही अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. एप्रिल ते जून या काळात देशातील दक्षिण किनारपट्टी तसेच वायव्य भारत वगळता बहुतांश भागात कमाल तापमान हे सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. यात राज्याच्या उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा तसेच विदर्भाचा समावेश आहे.
हवामान विभागाने एप्रिल ते जून या चार महिन्यांचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार देशाचा दक्षिण किनारपट्टीचा भाग वगळता मध्य, उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यात राज्यातील उत्तर व मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाड्यात २ ते ४ दिवसांची लाट येण्याचा अंदाज आहे. याच काळात किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. मध्य, पूर्व व वायव्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता असून, ती काही भागांत २ ते ४ दिवस, तर काही ठिकाणी ६ ते ८ दिवसांची असण्याची शक्यता आहे, तर ईशान्य व वायव्य तसेच दक्षिण किनारपट्टीच्या भागात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.
एप्रिलपासूनच उन्हाच्या झळा
हवामान विभागाने एप्रिलसाठीही अंदाज जाहीर केला असून, त्यानुसार ईशान्य व वायव्य तसेच दक्षिण किनारपट्टीचा भाग वगळता देशाच्या अन्य भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. त्यामुळे एप्रिलपासूनच उन्हाच्या झळा तीव्र होणार आहेत, तर किमान तापमान मात्र, सरासरीपेक्षा घट होण्याचा अंदाज आहे. तर बिहार, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेशचे अनेक भाग, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणाचे काही भाग, ओडिशा, गंगेचे खोरे, पश्चिम बंगाल, उत्तर छत्तीसगड, महाराष्ट्राचा पश्चिम भाग, गुजरातमध्ये सामान्य उष्णतेच्या लाटेचे दिवस जास्त असण्याची शक्यता आहे.
अवकाळीचाही अंदाज
एप्रिलमध्ये संपूर्ण देशात सरासरी पाऊसमान असण्याची शक्यता आहे, तर वायव्य, मध्य तसेच किनारपट्टीच्या प्रदेशात सामान्य ते सामान्यापेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे, तर पूर्व आणि ईशान्य भारत आणि पश्चिम किनाऱ्यावरील प्रदेशात काही ठिकाणी सामान्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
एल निनो अद्याप नाही?
सध्या, विषुववृत्तीय पॅसिफिक प्रदेशावर न्युट्रल एन्सोची स्थिती आहे. विषुववृत्तीय मध्य पॅसिफिक महासागरात आगामी हंगामात काही उबदार वातावरणासह समुद्राचे तापमान सामान्य असणे अपेक्षित आहे. पॅसिफिक महासागरावरील एन्सो स्थिती व्यतिरिक्त, इतर घटक जसे की हिंद महासागरातीस समुद्राचे सामान्य तापमान देखील भारतीय हवामानावर प्रभाव टाकतात. सध्या, न्यूट्रल हिंद महासागर द्विध्रुव (आयओडी) स्थिती हिंद महासागरावर कायम असून, उन्हाळ्यातही ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. यावरूनच मॉन्सूनवर प्रभाव टाकणाऱ्या एल निनो या घटकाची स्थिती अद्याप तयार झाली नसल्याचे या अंदाजावरून स्पष्ट झाले आहे.