कळस : पुणे नगर व सोलापूर जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनीने पाणीसाठ्यात यावर्षी १० दिवस अगोदरच ‘पन्नाशी’ पार केली आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत उजनी धरण यंदा लवकरच भरणार आहे. गतवर्षी पेक्षा यंदा १० दिवस अगोदरच उजनी पन्नास टक्के भरल्याने पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. गेल्या वर्षी ३१ जुलै रोजी पाणी पातळी पन्नास टक्के झाली होती. उजनी धरण पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला होता. मात्र आज १९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता ४९.९९ टक्के पाणी साठा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील पाऊस कमी जास्त असल्याने सध्या बंडगार्डन व दौंड येथील विसर्गात घट होत आहे. बंडगार्डन येथून ११ हजार ६१ क्युसेक तर दौंड येथून २१ हजार ५२५ क्युसेक विसर्ग उजनीत मिळत आहे. सध्या उजनी धरणात ९०.४० टीएमसी पाणीसाठा असून २६.७८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
दोन वर्षापूर्वी १९ जुलै २०२० रोजी उजनी उणे पातळीतून बाहेर आले होते. उजनी काही अपवाद वागळता ऑगस्ट ते सप्टेंबरअखेर पर्यंत शंभर टक्के भरत आले आहे. गेल्या दहा दिवसांत उजनीत ५९ टक्के पाणीपातळी वाढली आहे. गतवर्षी उजनीचा पाणलोट क्षेत्रात ६४६ मिलीमिटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षी दीड महिन्यात २६७ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. साधारणपणे ५०० ते ६०० मिली मीटर पाऊस उजनी पाणलोट क्षेत्रात होतो शेती, पाणीपुरवठा योजना, औद्योगिक क्षेत्र व अनेक शहराचा पाणीपुरवठा तसेच औद्योगिक वसाहती उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. उजनी मध्ये येणारा पाण्याचा विसर्ग कमी असला तरी उजनीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकरी आपले विद्युत पंप, गाळपिक द्वारे केलेली कडवळ, मका पिके काढत आहेत.