पुणे : यंंदा पुरूषोत्तम एकांकिका करंडकचा आवाज १६ ऑगस्टपासून घुमणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उर्जाकेंद्र असलेल्या या स्पर्धेतील ५१ संघांपैकी ४२ संघांच्या नाट्यसंहिता कोऱ्याकरकरीत आहेत. त्यामुळे ही स्पर्धा खास ठरणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अशा कोऱ्याकरकरीत संहिता येण्याचे प्रमाण कमी होते. पण यंदा मात्र विद्यार्थी चांगलाच कस लागणार असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित 5५८ व्या आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला बुधवारपासून (दि. १६) सुरुवात होत आहे. प्राथमिक फेरीसाठी या वर्षीपासून सुरू केलेल्या ऑनलाईन तिकिट विक्रीला पुणेकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून एक हजार रुपयांची प्राथमिक फेरीची तिकिटे संपली आहेत.
स्पर्धा दि. १६ ते ३० ऑगस्ट या कालावधीत भरत नाट्य मंदिरात होत आहे. स्पर्धेला सायंकाळी ५ वाजता सुरुवात होणार आहे. रविवारी (दि. २० आणि दि. २७) स्पर्धा दोन सत्रात (सकाळी ९ आणि सायंकाळी ५) होणार आहे. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी ९ संघांची निवड केली जाणार असून स्पर्धेची अंतिम फेरी दि. ९ आणि दि. १० सप्टेंबर रोजी होणार आहे. मराठवाडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘चिकन खर्डा विथ गार्लिक नान' या एकांकिकेने स्पर्धेचा पडदा उघडणार आहे तर स्पर्धेतील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालच्या ‘सुरेल चाललंय आमचं' या एकांकिकेने पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा समारोप होणार आहे.
स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची असली तरी आशयसंपन्न नाट्यकृतींच्या निर्मितीमुळे स्पर्धेला हजेरी लावण्याकडे पुणेकर प्रेक्षकांचा ओढा असतो. तिकिटे मिळत नसल्यामुळे प्रेक्षकांना स्पर्धेच्या आनंदाला मुकावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्रीय कलोपासकने यंदाच्या वर्षीपासून प्राथमिक फेरीची तिकिट विक्री ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यालाही पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.