यंदा अजित पवार एकटेच दिवाळी साजरी करणार; पुढील वर्षी कुटुंबासोबत - प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 04:53 PM2023-07-17T16:53:54+5:302023-07-17T16:55:23+5:30
अजित पवारांचे बंड लवकरच थंड होऊन वर्षभरातच राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येईल
पुणे : अजित पवारांच्या बंडखोरीने अन् राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यात राजकीय महानाट्य सुरु झाले आहे. अशातच आज पावसाळी अधिवेशनालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही एक होतील, असे सूचक वक्तव्य केले आहे. अजित पवारांना यंदा एकट्यालाच दिवाळी साजरी करावी लागणार आहे. पुढील वर्षी मात्र ते कुटुंबात दिवाळी साजरी करतील, अशी आपण अपेक्षा धरू असं ते म्हणाले आहेत. पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आंबेडकर म्हणाले, सरकारला सामान्य जनतेचे अथवा शेतकऱ्यांचे काही घेणेदेणे नाही. राज्यात सध्या शिंदे-फडणवीस-पवारांची चर्चा असली तरी त्यांच्या गोंधळात शेतकरी सगळ्यात शेवटी गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडाबाबत आंबेडकर म्हणाले, अजित पवारांचे बंड लवकरच थंड होईल. वर्षभरातच राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येईल. यंदाची दिवाळी अजित पवारांना एकट्यालाच साजरी करावी लागणार आहे. मात्र पुढील वर्षी मात्र ते कुटुंबात दिवाळी साजरी करतील, अशी आपण अपेक्षा धरू."
भाजपला महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकायच्या आहेत. त्यांना राज्यात एकही विरोधक नकोय. यातूनच राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. दुर्दैवाने हे विरोधकांच्या लक्षात येत नाही. अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे.