पुणेः बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला जाणारा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार यावर्षी प्रसिद्ध गायक पं. महेश काळे यांना देण्यात येणार आहे. रोख रूपये एक लाख ११ हजार १११ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर यंदाचा कोहिनूर गंधर्व पुरस्कार बंगलोरचे संगणक अभियंता व संगीत रंगभूमीवरील गायक -अभिनेता सुकृत ताम्हनकर यांना दिला जाणार आहे. रोख रूपये ५१ हजार आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून सोमवार दिनांक १५ जुलै २०२४ रोजी पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर आणि कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविली आहे. बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी ५.०० वाजता होणाऱ्या सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर-न्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, उद्योगपती श्रीधर प्रभू आणि नामवंत सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात यंदाचा अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार गोव्याचे महादेव हरमलकर यांना देण्यात येणार असून रूपये १५ हजार आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर भास्करबुवा बखले पुरस्कार गोव्याचे शिवानंद दाभोळकर यांना, गो. ब. देवल पुरस्कार पुण्याच्या दीप्ती भोगले यांना, काकासाहेब खाडिलकर पुरस्कार पुण्याचे निनाद जाधव यांना, डॉ. सावळो केणी पुरस्कार तळेगाव दाभाडेचे केदार कुलकर्णी यांना आणि खाऊवाले पाटणकर पुरस्कार ठाण्याचे सुधीर ठाकूर यांना देण्यात येणार आहे. प्रत्येकी १० हजार रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.याच समारंभात सांगलीच्या धनश्री फडके आणि चिपळूणचे राजाभाऊ शेंबेकर यांना रंगसेवा पुरस्काराने तर पुण्याचे अभय जबडे आणि माधुरी आंबेकर यांना द. कृ. लेले पुरस्काराने, तर मुंबईची कु. तन्वी गोरे हिला लक्ष्मीबाई पंडित पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रत्येकी रूपये पाच हजार आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
यावेळी स्मरणिका प्रकाशनानंतर 'गंधर्वरंग' ही नाट्य संगीताची मैफल होणार असून त्यात पं. महेश काळे, बकुल पंडित, मंजिरी कर्वे आलेगावकर, निनाद जाधव, राजाभाऊ शेंबेकर, तन्वी गोरे, सुकृत ताम्हनकर, धनश्री फडके, रवींद्र कुलकर्णी आणि सुरेश साखवळकर हे कलाकार सहभागी होणार आहेत. त्यांना ऑर्गनवर संजय गोगटे, शिवानंद दाभोलकर, तबल्यावर केदार कुलकर्णी आणि विद्यानंद देशपांडे तर व्हायोलिनवर प्रज्ञा शेवडे साथसंगत करणार आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे. तसेच बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे मंगळवार दिनांक १६ जुलै रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आणि आषाढी एकादशीनिमित्त बुधवार दिनांक १७ जुलै रोजी भरत नाट्य मंदिरात 'कान्होपात्रा' नाटकाचे प्रयोग सादर केले जाणार असून रसिकांना त्याचा विनामूल्य लाभ घेता येणार आहे.