पुणे: देशभरात आकर्षण असलेल्या पुण्यातील गणेशोत्सव विसर्जनाची तयारी सार्वजनिक मंडळांनी सुरू केली असून, मिरवणुकीत किती ढोल-ताशा पथके सहभागी व्हावीत व त्यांचे वादन कसे असावे? याबाबत गणेश मंडळ आणि ढोल पथके यांच्यात समन्वयाने नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार यंदा तीन चौकांमध्ये भाविकांना ढोल-ताशा वादनाचा आनंद घेता येणार आहे. एका ढोल-ताशा पथकात ५० ढोल वादक आणि १५ ताशा वादक अशी संख्या निश्चित करण्यात आली आहे.
शहरातील गणेशोत्सवात उत्साहाचे वातावरण आहे. पाच दिवसांचा गणपती आणि गौरी विसर्जनानंतर शहरातील विविध गणपती बाप्पांच्या दर्शनासह देखावे बघण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. शनिवार-रविवार सुटीचे औचित्य साधून पुणेकरांची पहाटे अडीच ते तीन वाजेपर्यंत गणेश दर्शनासाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. येत्या २८ सप्टेंबरला गणेश विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे. त्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. दरवेळी मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक निघाल्यानंतर अन्य गणेश मंडळांना या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मोठा कालावधी लागत होता, यंदा हा कालावधी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील गणेश मंडळ आणि ढोल-ताशा पथकांच्या समन्वयाने विसर्जन मिरवणुकीवेळी तीन चौकांमध्ये १०-१० मिनिटे ढोल-ताशा वादन केले जाणार असल्याची माहिती मंडळांकडून पोलिस प्रशासनाला देण्यात आली आहे.
अनंत चतुर्दशीनिमित्त पोलिस आणि महापालिकेतर्फे सर्व्हे करून विसर्जन मिरवणुकीवेळी येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांनी विसर्जन मिरवणूक मार्गावर वॉच टॉवर आणि बंदोबस्त लावण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, यंदा काही गणेश मंडळांनी आम्हालादेखील विसर्जन मिरवणुकीत लवकर सामील करून घ्या, असे आवाहन केले होते. त्यानुसार गणेश मंडळ आणि ढोल-ताशा पथकांच्या समन्वयाने यंदा काही निर्णय घेण्यात आले आहेत.
या चौकात होणार १० मिनिटे वादन..
विसर्जन मिरवणूक निघाल्यानंतर ढोल-ताशा पथकांच्या मर्यादित वादकांसह बेलबाग चौक, सेवा सदन चौक आणि टिळक चौक या तीन चौकांमध्ये प्रत्येकी १० मिनिटे वादन केले जाणार आहे. यावेळी ५० ढोल वादक आणि १५ ताशा वादक अशी संख्या निश्चित करण्यात आली आहे.
मिरवणूक मार्गांवर आमचा चोख बंदोबस्त
विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी मिरवणूक मार्गांवर आमचा चोख बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. गणेश मंडळ आणि ढोल-ताशा पथकांच्या सुरुवातीपासूनच्या मीटिंगमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त परिमंडळ १ तर्फे विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, गणेश मंडळे, ढोल-ताशा पथक आणि पोलिस प्रशासन यांच्यामध्ये असलेल्या समन्वयाने विसर्जन मिरवणूक उत्साहात आणि वेळेत पार पडेल अशी मला खात्री आहे. - संदीप सिंह गिल, पोलिस उपायुक्त, परिमंडळ - १