पुणेः ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल २०२४ चा पुण्यभूषण पुरस्कार शनिवार दि. २० जुलै २०२४ संध्याकाळी ५.४५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे इन्फोसिसचे संस्थापक- अध्यक्ष पद्मविभूषण एन.आर. नारायण मूर्ती यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी कळविली आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि पुण्यभूषण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर भूषविणार आहेत.
डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्कारासाठी डॉ.भटकर यांची निवड केली आहे. तसेच यावेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना आणि वीरमातेलाही गौरविण्यात येणार आहे. पुरस्कराचे यंदाचे ३६ वे वर्ष आहे. सलग ३५ वर्षे संस्थेने, संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि देशाच्या बाहेरही ह्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराचा भव्य उपक्रम राबविला. यंदा या पुरस्काराची रक्कम एक लाख रूपयांवरून वाढवून दोन लाख रुपये करण्यात आली आहे. या रकमेच्या थैलीसह सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली बालशिवाजींची प्रतिकृती, या नगरीच्या ग्रामदैवतांसह वैशिष्ट्यपूर्ण असे पुण्यभूषण स्मृतीचिन्हात हे पुरस्काराचे स्वरूप आहे.