पुणे : वार्षिक सत्र परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांची उन्हाळ्याची सुट्टी सुरू होते. मात्र, यंदा परीक्षा झाल्यानंतरही सुमारे 15 दिवस शाळा सुरू ठेवाव्या लागणार आहेत. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला किंवा नातेवाईकांकडे जाण्याचे नियोजन एप्रिल महिन्यानंतरच करावे लागणार आहे.
सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्च महिन्यात सकाळच्या सत्रात शाळा सुरू ठेवल्या जातात. परंतु, यंदा मार्च ते एप्रिल अखेरपर्यंत इयत्ता पहिली ते नववीपर्यंतचे वर्ग पूर्णवेळ सुरू ठेवाव्यात. तसेच एप्रिल अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सुरू ठेवाव्यात. रविवारी सुध्दा ऐच्छिक स्वरुपात शाळा सुरू ठेवता येतील. त्याचप्रमाणे दररोज शाळांमध्ये 100 टक्के विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी कोणत्याही कारणासाठी शाळेत येत नाहीत. परंतु, यंदा परीक्षा संपल्यानंतरही शाळेत यावे लागेल, असे शिक्षण विभागाने प्रसिध्द केलेल्या अध्यादेशानुसार दिसून येत आहे. मार्च महिन्याच्या तिस-या आठवड्यात परीक्षा घेतल्यानंतर मे महिन्यात निकाल जाहीर करावा,असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले म्हणाले, अनेकांना कोरोनामुळे दोन वर्षे घराबाहेर जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये गावी जाण्यासाठी पालकांनी एस.टी. व रेल्वेचे रिझर्वेशन करून ठेवले. मात्र,परीक्षा संपल्या तरीही शाळा सुरूच राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गावी जाण्यासाठी मे महिन्याची वाट पहावी लागेल. तसेच निकाल तयार करण्यासाठी काही दिवसांची सुट्टी आवश्यक असून दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात अडथळा येणार नाही,याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र,शासनाने प्रसिध्द केलेल्या अध्यादेशामुळे काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.