८ जागी विजय मिळवून कुल गटाची कडवी झुंज
यवत :
यवत ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीच्या लढतीत थोरात गटाने सलग तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत विजय मिळवून हैट्रिक साधली.१७ पैकी ९ जागांवर थोरात गट तर ८ जागांवर कुल गटाने बाजी मारल्याने परत एकदा काठावरचे बहुमत थोरात गटाला मिळाले आहे.
दौंड तालुक्यातील सर्वाधिक मतदार संख्या असलेली यवत ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी थोरात व कुल गटात मोठी चुरस होती.आज निकालात देखील सदर चुरस समोर आली.मागील पंचवार्षिक निवडणुकीत देखील थोरात गटाला १७ पैकी ९ जागा तर कुल गटाला ८ जागा मिळाल्या होत्या.याही वेळी हाच निकाल कायम राहिल्याने सत्तेने परत एकदा कुल गटाला हुलकावणी दिली तर थोरात गटाला काठावरचे बहुमत मिळाल्याने परत दिलासा दिला आहे.
* वार्ड क्रमांक १ :-
वार्ड क्रमांक १ हा माजी आमदार थोरात गटाचा बालेकिल्ला समजला जातो.मागील अनेक निवडणुकीत या वार्ड मधून थोरात गटाने निर्विवाद सत्ता मिळविली होती.आताच्या निवडणुकीत ३ पैकी एका जागेवर कुल गटाच्या उमेदवाराने विजय मिळविल्याने थोरात गटाच्या किल्ल्याला तडा गेला आहे.या वार्डात कुल गटाचे नाथदेव सुदाम दोरगे तर थोरात गटाचे लंका लक्ष्मण कोळपे व गौरी विकास दोरगे यांनी विजय मिळविला.
वार्ड क्रमांक २ :-
वार्ड क्रमांक २ मध्ये देखील मोठी चुरस होती.या वार्डात मोठ्या प्रमाणावर पैस्याचा वापर झाल्याची चर्चा होती.यामुळे विजयी कोण होते याकडे लक्ष लागले होते.मात्र येथेही थोरात गटाला २ जागा तर कुल गटाला एका जागेवर विजय मिळाला.थोरात गटाच्या समीर मारुती दोरगे व इम्रान अजमुद्दीन तांबोळी तर कुल गटाच्या मंगल किरण खेडेकर या विजयी झाल्या .
वार्ड क्रमांक ३ :-
वार्ड क्रमांक ३ मध्ये कुल गटाने निर्विवाद वर्चस्व राखले. येथे थोरात गटातून कुल गटात उडी घेतलेले माजी उपसरपंच सुभाष यादव यांनी विजय मिळवीत थोरात गटाला धक्का दिला.येथून सुभाष शंकर यादव व उज्वला शिवाजी शिवरकर यांनी चांगल्या मतधिकाने विजय मिळविला.
वार्ड क्रमांक ४: -
वार्ड क्रमांक ४ मध्ये निवडणुकीत मोठी चुरस होती मात्र निकालात मोठ्या मतधिकाने कुल गटाच्या तीनही उमेदवारांनी बाजी मारली.थोरात गटाने ऐन निवडणुकीत कुल गटाच्या रोहन दोरगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश देत उमेदवारी दिली होती.मात्र त्यांचा सपशेल पराभव झाल्याने थोरात गटाला या वार्डातून परत एकदा धोबीपछाड मिळाला.कुल गटाचे गौरव प्रल्हाद दोरगे , राजेंद्र अशोक शेंडगे व मंदाकिनी रामचंद्र कुदळे यांनी मोठ्या मतधिकाने विजय मिळविला.
वार्ड क्रमांक ५ :-
वार्ड क्रमांक ५ मध्ये थोरात गटाचे माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.या वार्डात देखील मतदारांनी संमिश्र कल देत २ जागांवर थोरात गट तर एका जागी कुल गटाला विजयी केले.कुंडलिक खुटवड यांचे पुतणे मनोहर नामदेव खुटवड व कोमल नरेंद्र कदम तर कुल गटाच्या मनीषा सोमनाथ रायकर यांनी विजय मिळविला.
वार्ड क्रमांक ६ :-
वार्ड क्रमांक ६ मधील लढत देखील लक्षवेधी होती. कुल गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. भीमा पाटस कारखान्याचे संचालक सुरेश शेळके यांचे पुत्र गणेश शेळके व माजी उपसरपंच सदानंद दोरगे यांच्यात मोठी अटीतटीची लढत येथे होती.मात्र सदानंद दोरगे यांनी मोठ्या मताधिक्याने येथून विजय मिळवीत कुल गटाला चांगलाच हादरा दिला.थोरात गटाचे तीनही उमेदवार सदानंद वामन दोरगे , सुजाता विष्णू कुदळे व नंदा मल्हारी बिलकुले यांनी येथून विजय मिळविला.
चौकट :-
चारही माजी उपसरपंच विजयी ... यवत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चार माजी उपसरपंच परत उभे राहिले होते. हे सर्व चार माजी उपसरपंच थोरात गटात होते.त्यापैकी नाथदेव दोरगे व सुभाष यादव यांनी कुल गटात प्रवेश करत निवडणूक लढविली होती.आताचा निवडणुकीत थोरात गटातील माजी उपसरसपंच राहिलेले सदानंद दोरगे व समीर दोरगे तर कुल गटात प्रवेश केलेले नाथदेव दोरगे व सुभाष यादव यांनी विजय मिळविला आहे.