लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दोघांनी रात्रीच्या वेळी एका तरुणाला लुटले़ इतकेच नाही तर त्याच्या खिशातील एटीएम कार्ड घेऊन त्याद्वारे पैसेही काढून घेतले. मात्र, आपण लुटल्याची तक्रार हा पोलिसांना देईल, असे वाटल्याने त्यांनी त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह कालव्यातील वाहत्या पाण्यात फेकून दिला. हडपसर पोलिसांनी सिंहगड रोड ते हडपसर दरम्यान २५० सीसीटीव्ही कॅमेरे आणि खब-यांच्या मदतीने हा खून करणा-या दोघांना गजाआड केले.
मिलिंद पवळे (रा. धायरी फाटा) आणि सतीश संजय सुतार (रा. सिंहगड रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राहुल श्रीकृष्ण नेने (वय ४५) असे खून झालेल्याचे नाव आहे.
आरोंपीनी पर्वती येथील शंकर मंदिराजवळ असलेल्या कॅनॉलजवळ नेने यांना नेऊन तेथे त्यांच्या डोक्यात दगड घालून मृतदेह कालव्यात फेकला होता. तो वाहत जाऊन १५ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास हडपसर येथील शिंदेवस्ती परिसरात कॅनॉलमध्ये आढळून आला होता. पोलिसांनी परिसरात चौकशी केली. परंतु काही माहिती मिळू शकली नाही. परिसरातील फुटेज तपासल्यावर पोलिसांना नेने हे सिंहगड रोड परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी चौकशी केल्यावर नेने हे १३ मार्च रोजी रात्री घरातून बाहेर पडले ते परत आले नसल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी सिंहगड रोडवरील संतोष हॉल, राजाराम चौक, दांडेकर पूल परिसरातील विविध रस्त्यांवरील सुमारे २५० सीसीटीव्ही तपासले. त्यात दोघे जण नेने यांना एका मोपेडवरून घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यावरुन संजय सुतार व मिलिंद पवळे यांची नावे निष्पन्न झाली. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. दोघांनी नेने यांना दांडेकर पुलाजवळील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये नेऊन मारहाण केली. त्यांच्याकडील पैसे काढून घेतले. मात्र, नेने याला जिवंत ठेवले तर तो आपली नावे पोलिसांना सांगेल, या भीतीने त्यांनी त्याला पर्वतीजवळील कॅनॉलजवळ नेले. तेथे त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला व त्यानंतर त्याचा मृतदेह पाण्यात टाकून दिला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम व त्यांच्या सहका-यांनी हा छडा लावला.