या रुग्णालयांमध्ये बुधवार दिनांक २८ रोजी ऑक्सिजनअभावी चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. संबंधित बाब प्रशासनाला कळताच त्या रात्री अधिकारी दाखल झाले. यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक अशोक नांदापूरकर, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ, यवत येथील डॉ. शशिकांत इरवाडकर आदींचा या पथकामध्ये सामावेश होता.
या वेळी अधिकाऱ्यांनी रुग्णालय, संशयास्पद मृत्यू, नातेवाइकांच्या प्रतिक्रिया, ऑक्सिजनसंदर्भात माहिती, वाढीव देण्यात आलेली बिले, आवश्यक सोयीसुविधा, कोविड सेंटरच्या रुग्णांसाठी मिळालेली परवानगी, प्रत्यक्षात दाखल, वाढीव रुग्णसंख्या यासंदर्भात संबंधित डॉक्टरांची कसून चौकशी केली.
यासंदर्भात तहसीलदार संजय पाटील म्हणाले की, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कोविड सेंटरच्या वाढीव बिलांसंदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली असून, दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. रुग्णांचे नातेवाईक नीलेश जांबले म्हणाले की, महागडी बिले व गलथान कारभारामुळे नातेवाइकांनी संबंधित कोविड सेंटरसंदर्भात यवत पोलीस स्टेशनला तक्रार केली. यासंदर्भात आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.
--
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना नाही फोन उचलण्यास वेळ
केडगाव येथील घटनेनंतर तालुक्यातील विविध पत्रकार यांनी तालुका आरोग्य अधिकारी व त्यांच्या कार्यालयाशी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी फोनच उचलला नाही. यावरून तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ यांना फोन उचलण्यास वेळ नसल्याची चर्चा सगळीकडे झाली.