पुणे : आमदार संग्राम थोपटे यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने नाराज झालेल्या समर्थकांनी मंगळवारी काँग्रेस भवन फोडले आहे. मात्र थोपटे यांनी 'ते माझे कार्यकर्ते नाहीत, हे माझ्याविरोधील षड्यंत्र' असल्याचा नवा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. थोपटे यांनी बुधवारी पुण्यात येऊन काँग्रेस भवनाची पाहणी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, 'भोर-वेल्हा- मुळशी' असा विस्तीर्ण मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात थोपटे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. यापूर्वीही त्यांच्या वडिलांनी याच भागातून राजकीय ठसा उमटवला आहे. त्यामुळे थोपटे गटाला यावेळी मंत्रिपदाची अपेक्षा होती. ती पूर्ण न झाल्याने संतप्त समर्थकांनी सोमवारी भोरमध्ये आंदोलन करत घोषणाबाजी केली होती.याशिवाय भोर नगरपालिकेच्या सर्व 20 नगरसेवकांसह इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचीही घोषणा केली होती. मात्र इतक्यावरच न थांबता मंगळवारी संध्याकाळी 6च्या सुमारास 40 ते 50 कार्यकर्त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर भागातील काँग्रेस भवनाची तोडफोड केली.
आता थोपटे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, 'मला स्वतःला पक्षश्रेष्ठींनी दिलेला निर्णय मान्यच आहे आणि कायम राहील. सदर प्रकार घडला तेव्हा मी भोरमध्ये नव्हतो. मात्र अधिक माहिती जाणून घेतली असता हे माझे कार्यकर्ते नाहीत असे समोर आले आहे. कोणीतरी माझ्याविरोधात षडयंत्र रचत असल्याचा सनसनाटी आरोपही त्यांनी केला'.