पुणे : रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाला बँकेत सोडण्याचे आमिष दाखवत हत्याराचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघा जणांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांनी या तरुणाची १ लाख ९० हजारांची रोकड लुटली होती. ही घटना ६ डिसेंबर रोजी दुपारी हडपसर परिसरात घडली होती. आरोपींना न्यायालयाने २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एजाज इस्लामउद्दीन अन्सारी (वय २१, रा. गाडीतळ, हडपसर), ओमकारसिंग करतारसिंग टाक (वय २०, रा. गाडीतळ, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सोमनाथ दिगंबर थोरात (वय ३०, रा. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरात रकमेचा भरणा करण्यासाठी बँकेत जात होते. त्या वेळी एजाज अन्सारी आणि ओमकारसिंग टाक यांनी त्यांना बँकेत सोडतो, असे सांगत गाडीवर बसवून सोबत नेले. कालव्याजवळ नेऊन चाकूच्या धाकाने त्यांच्याजवळची रोकड हिसकावत पळ काढला होता. पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली.(प्रतिनिधी)
रोकड लुटणाऱ्यांना अटक
By admin | Published: December 26, 2016 3:47 AM