अतुल चिंचली -
पुणे: माझ्या लहानपणापासून खग्रास आणि खंडग्रास ग्रहणे पाहण्याची आवड होती. तसेच वडीलधारी मंडळी व शालेय शिक्षकांकडून ग्रहणाबद्दल मिळणाऱ्या माहितीने त्या विषयीची उत्सुकता आणखीनच ताणली गेली. त्याकाळचं अजून एक वैशिष्टये म्हणजे लहान असताना ग्रहणाच्यावेळी दान मागणारी लोकं येत होती. मात्र हल्ली ती नजरेला पडत नाही.. वर्षातून अनेकवेळा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण दिसतात. माझ्या वडिलांनी लावलेल्या सवयीमुळेच लहानपणापासूनच सूर्यग्रहण पाहत आले आहे. त्यामुळे आतापर्यंत जवळपास दोनशेपेक्षा जास्त सूर्यग्रहण माझ्या पाहण्यात आली आहेत, असा अनुभव ज्येष्ठ महिला सुमन सुकाळे यांनी ‘लोकमत’ ला सांगितला. गुरुवारी सकाळी पुण्यात खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाले. यासाठी बालगंधर्व पुलावर नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठांचा सहभाग दिसून आला. बऱ्याच प्रतीक्षेनंतर सूर्यग्रहण दिसले तरी नागरिकांनी ते पाहण्याचा मनमुराद आनंद लुटला. सुमन सुकाळे यांचा जन्म १९५२ साली झाला. आता त्यांचे वय ६७ आहे. लहानपणापासूनच त्या वडिलांसोबत सूर्यग्रहण पाहायला जात असे. सुकाळे म्हणाल्या, आम्ही लहान असताना वडील आवडीने सूर्यग्रहण बघायला घेऊन जात असे. पण १९६१ सालापासून म्हणजेच अकरा वर्षांची असताना सूर्यग्रहणबद्दल कळू लागले. तेव्हा चष्मा घालून सूर्यग्रहण पाहा. अशी जनजागृती केली जात नव्हती. म्हणून बहुतेक लोकांना त्रासही होत असे. आता मात्र वृत्तपत्रे, अनेक संस्था याबाबत माहिती देतात. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याकाळात खग्रास आणि खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळत असे. शालेय अभ्यासक्रमापेक्षा वडीलधाऱ्या माणसांककडून सूर्यग्रहण म्हणजे काय. हे सांगितले जात होते. आम्ही लहान असताना सूर्यग्रहणाच्या वेळी दान मागणारी लोक येत होती. त्यांना ग्रहणाच्या एका दिवसात भरभरून दान मिळत होते. प्रत्येक नागरिक त्यांना पैसे किंवा इतर गोष्टी देत होते. आता मात्र ती लोक अजिबात दिसत नाहीत. ग्रहणाच्या वेळी दान मागणाऱ्या लोकांचे वेगळेपण होते. एवढ्या वर्षात १९८० साली सर्वात मोठे खग्रास सूर्यग्रहण दिसले होते. ते अजूनही लोकांच्या लक्षात आहे. आतापर्यंत तसे सूर्यग्रहण दिसले नाही. पूर्वी सूर्यग्रहणाच्या वेळी शक्यतो ढगाळ वातावरण आढळत नसे. परंतु वातावरणातील बदलामुळे या सूर्यग्रहण पाहणे अवघड होतं चालले आहे. ज्येष्ठांपेक्षा लहान मुलांनी आणि तरुणांनी अशा भौगोलिक गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.........