मी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते; कारण जनता माझ्या पाठिशी - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 08:26 PM2022-04-03T20:26:41+5:302022-04-03T20:26:54+5:30
नरेंद्र मोदींची भूमिका ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पाठिंबा देणारी, संविधानाचे संरक्षण करणारी, दलितांच्या आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा देणारी आहे
पिंपरी : मंत्रीपद येत - जात राहते. मात्र काॅंग्रेसच्या काळात मला मंत्रीपद मिळाले नाही. काॅंग्रेसने ती संधी दिली नाही. तसेच आम्ही कुणाची निंदा नालस्ती करीत नाही, हा नेता असा, तो नेता तसा, अशी सवय आम्हाला नाही, पण मी ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते. कारण जनता माझ्या पाठिशी आहे. आम्ही कुणावर टिका करीत नाही. असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले ब्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे रविवारी (दि. ३) सायंकाळी पिंपरी येथे सत्ता संकल्प मेळावा झाला. यावेळी आठवले बोलत होते.
आठवले म्हणाले, स्वत:च्या बळावर निवडून येणारा रिपब्लिकन पक्ष करायचा आहे. नरेंद्र मोदींची भूमिका ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पाठिंबा देणारी, संविधानाचे संरक्षण करणारी, दलितांच्या आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा देणारी आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष त्यांच्यासोबत आहे. शिवसेना, भाजपासोबत जाताना मी सर्वांना विचारले. सर्वांनी सांगितले की, जायला हरकत नाही. राजकारणात असे धाडसी निर्णय घ्यायचे असतात. त्यामुळे आम्ही भाजपासोबत आहोत.
मी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते
केंद्रामधील मंत्रिपद हे स्वत:साठी नव्हे तर सामान्यांसाठी आहे. काॅंग्रेसच्या काळात मला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. काॅंग्रेसने ती संधी दिली नाही. पण मी ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते. कारण जनता माझ्या पाठिशी आहे. आम्ही कुणावर टिका करीत नाही. कुणाची निंदा नालस्ती करणे, हा नेता असा आहे, तो नेता तसा आहे, अशी सवय आम्हाला नाही. आम्ही आमचा कार्यक्रम लोकांसमोर मांडत असतो, असे आठवले म्हणाले.
‘त्या’ अधिकाऱ्यांची बदली करून टाकू
सामाजिक न्याय मंत्रालयाकडून विविध योजना राबविण्यात येतात. त्याचा लाभ तरुणांनी घ्यावा. तरुणांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे. कर्ज घेऊन उद्योग उभारावे. त्यासाठी मी दिल्लीत आहे. कर्ज मागणी करूनही अधिकाऱ्यांनी ऐकले नाही तर त्या अधिकाऱ्यांची बदली करून टाकल्याशिवाय राहणार नाही, असे रामदास आठवले म्हणाले.