पुणे : वाइन शॉपवर असताना रिक्षाचालकाशी भांडणे करून त्याच्या डोक्यात बीअरची बाटली मारल्याने पोलिसांनी दुकानाच्या मॅनेजरला अटक केली होती. त्याला जामीन मिळवून देण्यात दुकान मालकाने पुढाकार घेतला. त्याच मालकाच्या दुकानात तीन दिवसांची साठवलेली कॅश घेऊन तो मॅनेजर पळून गेला होता. शिक्रापूर पोलिसांनी त्याचा उत्तर प्रदेशात तब्बल ६ दिवस शोध घेऊन लखनौमधून त्याला अटक केली. भानु प्रताप सिंह (मूळ रा. उन्नाव, उत्तर प्रदेश) असे या मॅनेजरचे नाव आहे. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत वासुमल मानकानी (वय ६५, रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांचे सणसवाडी येथे व्हिनस वाइन नावाने शॉप आहे. तेथे भानु प्रताप सिंह हा मॅनेजर म्हणून काम करीत होता. दारूविक्रीची दररोज जमा होणारी रक्कम तसेच माल खरेदीविक्री व वाइन शॉपमधील देखरेख करण्याचे काम ताे करत असे. व्यवसायाची रक्कमही तो बँकेत जमा करीत असे. जून महिन्यात त्याचे एका रिक्षाचालकाशी भांडणे झाले होते. त्यावेळी त्याने रिक्षाचालकाच्या डोक्यात बीअरची बाटली फोडून जखमी केले होते. त्या गुन्ह्यात पोलिस नाईक रविकांत जाधव यांनी अटक केली होती. त्याला जामिनावर सोडवून आणण्यात फिर्यादी यांनी मदत केली होती. जामिनावर सुटल्यानंतर भानु प्रताप सिंह हा दुकानात जमा झालेली २ लाख २० हजार ३०० रुपयांची रोकड घेऊन १ जून रोजी पसार झाला. त्याने मोबाइलही बंद ठेवला होता.
शिक्रापूर ठाण्याचे पोलिस नाईक रविकांत जाधव व संतोष मारकड हे आरोपीच्या शोधासाठी प्रथम वाराणसी येथे गेले. तेथून त्यांनी तांत्रिक तपासाद्वारे लखनौमधील पोलिस निरीक्षक अंजनी तिवारी यांच्या सहकार्याने त्याला पकडले. रविकांत जाधव यांनी त्याला अगोदर अटक केली असल्याने लगेच ओळखले.