पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या घडामोडींमध्ये अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ३२ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपदे देण्यात आली. त्यानंतर आता ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वेगवेगळ्या बैठकांनंतर पवार कुटुंबात उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. या राजकारणावर रोहित पवारांनी भाष्य केलं आहे. जे आता भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांनी भाजपविरोधात खूप वेळा भूमिका घेतली आहे. अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
रोहित पवार म्हणाले, कुटुंब फुटणं हि फार गंभीर गोष्ट आहे. आपल्यावर वेळ आली कस वाटत हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. जी लोक भाजपच्या मांडीला मांडी लावून बसली आहेत. त्यांनी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आज फक्त सत्ता मिळावी म्हणून तुम्ही विचारधारा बदलून सत्तेत जात असाल तर सामान्य लोकांनी काय तुमच्याकडे कस पाहावं. जेव्हा हे नेते एका विचारधारेला धरून भूमिका घेत होते. तेव्हा शरद पवारांना असं वाटलं नव्हतं कि हे सत्तेसाठी विचारसरणी सोडतील.
पवार साहेबानी काँग्रेस सोडल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. असे रोहित पवारांना विचारले असता ते म्हणाले, पवार साहेबानी काँग्रेस सोडली नाही. त्यांनी नवी पार्टी सुरु केली. लोक जुन्या गोष्टीचा दाखला देऊन काही बोलतील. राज्यात शिक्षण, बेरोजगारी अशा अनेक अडचणी आहेत. ते सोडून राजकारणावर भाष्य केलं जातंय. त्यामुळे इथले व्यवसाय गुजरातला घेऊन जाणे बंद होणार आहे का? अधिवेशनात मुखमंत्री आश्वासन देऊन अंगणवाडी सेविकांच्या पगाराचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भाव अशा प्रश्नाबद्दल बोलले जात नाही. फक्त राजकारणावर भाष्य केलं जातं. आताच्या परिस्थितीत ज्यांना पद मिळाली ते विकासासाठी गेलो म्हणत आहेत. पण विकास महत्वाचा असला तरी विचारसरणी महत्वाची असं मला वाटते. अजित पवारांना त्यांच्यासोबत असणारे चार, पाच लोक व्हिलन बनवत आहेत. मतदार अजित पवार गटासोबत राहणार नाहीत. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.