पुणे : पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणाऱ्या पक्षाला जे जमलं नाही ते भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात करून दाखवलं. असे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्यावरच नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रुपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर ट्विटरच्या माध्यमातून निशाण साधला आहे.
''शरद पवार साहेबांच्या वर टीका करण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाने नेमलेल्या राज्याच्या अध्यक्षाला स्वतःच्या मतदार संघात आमदार होता आले नाही. पुरात वाहून आलेले पुण्याचे स्वयंघोषित दादा..! असा टोला रुपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.''
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुण्यात रविवारी अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांनी असे वक्तव्य केले होते.
पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पक्षालाही या महाराष्ट्रात 60 च्या वर आमदार निवडून आणता आले नाही
''2014 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणता आले. 2019 मध्ये देखील 105 आमदार निवडून आले. देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पक्षालाही या महाराष्ट्रात 60 च्या वर आमदार निवडून आणता आले नाही. देशात अनेक वर्ष राज्य केलेल्या काँग्रेसलाही 70 पेक्षा जास्त आमदार निवडून आणता आले नाही. आणि नरेंद्र मोदींच्या नावावर मते मागून धोका देणाऱ्या शिवसेनेलाही 73 च्या वर आमदार निवडून आणता आले नाही. परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बूथ संपर्क योजनेच्या जोरावर 100 हुन अधिक आमदार निवडून आले असल्याचे पाटील म्हणाले होते.''