पुणे : जे लाेकं आपल्या कामावर मतं मागू शकत नाहीत, ते जात, धर्म, पंथाच्या आधारे मतं मागतात. जनतेने देखील जात, धर्म, पंथाच्या आधारावर मत देऊ नये असे आवाहन केंद्रीय दळण वळण मंत्री नितीन गडकरी यांनी केले. पुण्यातील शिवाजीनगर भागात युतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ गडकरींची सभा झाली त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी खासदार अनिल शिराेळे, माजी खासदार प्रदीप रावत, आमदार विजय काळे आदी उपस्थित हाेते. माणूस जातीने नाही तर गुणाने श्रेष्ठ ठरताे असेही गडकरी यावेळी म्हणाले.
गडकरींनी भलीमाेठी आकडेवारी देत आपण केलेल्या कामाची माहिती दिली. तसेच मी खाेटं बाेलत नाही, खाेटी आश्वासने देत नाही. जे बाेलताे ते करत असताे असेही गडकरी यांनी ठणकावून सांगितले. गडकरी म्हणाले, आपला देश बलवान आहे परंतु जनता गरीब आहे. 60 वर्षे काॅंग्रेसला सर्वच ठिकाणी राज्य करण्याची संधी मिळाली. परंतु त्यांनी देशाचा सत्यानाश केला. नेहरुंचं विकासाचं माॅडेल हे रशियाच्या माॅडेलवर आधारित हाेतं. कम्युनिस्ट विचारधारेची अवस्था भारताबराेबरच चीन आणि रशियामध्ये बिकट आहे. कम्युनिस्ट विचारधारेमुळे देशाचा विकास न झाल्याने बुडापाेस्ट शहरामध्ये कम्युनिस्ट नेत्यांचे पुतळे एका बागेत ठेवण्यात आले आहेत.
राष्ट्रवाद हा भाजपाच्या विचारधारेचा आत्मा आहे. आम्ही गरिबांना केंद्रबिंदू मानून आर्थिक धाेरण ठरवले. गावातले रस्ते मजबूत करण्यासाठी शहरातले रस्ते पीपीपी तत्त्वार करण्याचा निर्णय घेतला. मी 17 लाख काेटी रुपयांची विकास कामे देशात केली. महाराष्ट्राला 5 लाख काेटी रुपये दिले. काॅंग्रेस राष्ट्रवादीवर टीका करताना गडकरी म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील सिंचनाची कामं गेली 15 वर्षे रखडली हाेती. ती आम्ही सुरु केली. रस्त्याची कामं अशी केली आहेत की पुढच्या अनेक पिढ्या गेल्या तरी त्यांना खड्डे पडणार नाहीत.
पुण्यात ब्राॅडगेज मेट्राे करणार
पुण्यापासून नगर, काेल्हापूर, साेलापूर, सातारा, लाेणावळा अशी ब्राॅडगेज मेट्राे सुरु करण्याचा विचार आहे. यामुळे या शहरांचे अंतर कमी हाेणार आहे. तसेच खर्च देखील अनेक पटींनी कमी हाेणार असल्याचे गडकरी पुण्यातील सभेत म्हणाले.