पुणे : ‘पुराणांमुळे माणसे गुलाम होतात. विद्यापीठांमधून महाभारत, ज्ञानेश्वर कसले शिकवता? समतेचा विचार करणाऱ्यांची संख्या वाढवणारे शिक्षण हवे, कमी करणारे नाही. तसे होत नाही म्हणूनच आजही परिवर्तनाचा विचार मांडणाऱ्यांच्या गोळ्या झाडून हत्या केल्या जातात,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक, आंबेडकरवादी विचारवंत राजा ढाले यांनी केले. महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी ढाले यांना प्रदान करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार जयदेव गायकवाड, पुरस्कार निवड समितीचे सदस्य प्रा. विलास आढाव, स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम, अरविंद शिंदे, बंडू केमसे, राजेंद्र वागस्कर, वासंती गायकवाड आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.‘पुणे विद्यापीठाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले जाते, माझ्यासारख्याला पुरस्कार दिला जातो, याचा अर्थ पुणे सभ्य झाले आहे, असा घ्यायला हरकत नाही,’ अशा शब्दांत जुन्या पुण्याचे स्मरण करीत ढाले म्हणाले, ‘‘सगळा संघर्ष माणूस होण्याचा आहे. फुले, आंबेडकरांनी तो सुरू केला. त्यांच्यातून माझ्यासारखे अनेक जण तयार झाले. विठ्ठल रामजी शिंदे यांनी इथेच डोंगराएवढे काम केले. महात्मा फुले यांच्या एका विद्यार्थिनीने निबंध लिहिला व अन्यायाला वाचा फोडली, याची दखल घेतली जात आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, संघर्ष संपलेला नाही. आजही प्रतिगामींची संख्याच जास्त व पुरोगामींची कमी आहे. ती वाढते आहे.’’सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)-१९७२मध्ये ढाले यांच्या एका लेखाच्या विरोधात पुणे महापालिकेने तहकुबी आणली होती व आज त्याच महापालिकेकडून त्यांना पुरस्कार दिला जातो आहे, अशी सुरुवात करून अजित पवार यांनी ‘पुणे बदलते आहे,’ असाच याचा अर्थ असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांमुळे परिवर्तनाची लढाई गतिमान होत गेली. वंचित, उपेक्षित समाजाला बरोबर घेऊनच विकास केला पाहिजे. ढाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी दाखवली. त्यांनी समाजाला नवी दृष्टी दिली. आज आर्थिक आरक्षणाचा विचार मांडला जात आहे. मात्र, तो घटनाविरोधी विचार आहे. त्यामुळेच समाजाला आजही ढाले यांच्या नेतृत्वाची, मार्गदर्शनाची गरज आहे.’’
परिवर्तनाचा विचार मांडणाऱ्यांच्या होतात हत्या
By admin | Published: October 02, 2015 12:50 AM