पिंपरी : बाइकटॅक्सी विरोधात आंदोलन करण्यासाठी पिंपरी- चिंचवड तसेच पुणे शहरातील १७ रिक्षा संघटना बाइकटॅक्सी विरोधी आंदोलन कृती समितीमध्ये सहभागी होत्या. मात्र, आंदोलनात फूट पाडत असल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांना आंदोलन समितीमधून वगळण्यात आले आहे. तर, काही बोगस प्रतिनिधींनी संघटनेमध्ये प्रवेश करून आंदोलन भरकटवले, असा आरोप बाबा कांबळे यांनी केला आहे.
पुणे आरटीओ परिसरात सोमवारी (दि. २८) बेकायदा बाइकटॅक्सी विरोधात रिक्षासंघटनांनी आंदोलन केले. मात्र, सरकारच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, आश्वसन पूर्ण केले नाही, तर पुन्हा आंदोलनाचा इशारा संघटनेकडून देण्यात आला. मात्र, मागण्यांची पूर्तता होण्यापूर्वीच संघटनेमध्ये असलेले मतभेद समोर आले आहेत.
बाबा कांबळे यांना अनेकवेळा समज देऊनसुद्धा त्यांनी जाणूनबुजून पत्रकारांसमोर वाद उकरून काढून आंदोलनात फूट पडेल, असा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलन समितीने एक मताने ठराव करून बाबा कांबळे यांना संघटनेतून वगळले आहे, अशी भूमिका बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी मांडली.
रिक्षा पंचायत कायदेशीर मार्गाने लढा उभारणार
नागरिकांच्या गैरसोयीसह हिंसक आंदोलन नको, अशी भूमिका घेतल्यानेच माझ्या बदनामीचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, रिक्षाचालकांच्या प्रश्नावर महाराष्ट्र रिक्षा पंचायत कायदेशीर मार्गाने लढा उभारणार आहे. चुकीच्या मार्गाने आंदोलन केल्याने रिक्षाचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. - बाबा कांबळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत
आंदोलनाला कमजोर करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही
रिक्षाचालकांच्या प्रश्नांप्रती बेशिस्त व अप्रामाणिक अशी कोणतीही कृती आंदोलन समिती खपवून घेणार नाही. चुकीचा संदेश पसरवून १२ लाख रिक्षाचालकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असणाऱ्या या आंदोलनाला कमजोर करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, याबाबत आंदोलन समितीतील सर्व सभासद ठाम आहेत. - केशव क्षीरसागर, अध्यक्ष, बघतोय रिक्षावाला