पिंपरी : नयनतारा सहगल यांचे साहित्य संमेलनातील भाषण रद्द करणे हे सुसंस्कृत समाजाला शोभणारे नाही. एखादा विचार जेव्हा दाबण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा तो सहजासहजी नष्ट होत नाही. तो केव्हातरी बाहेर येतोच, असे प्रतिपादन डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले. चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात स्वंयसिद्द प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या ‘चला व्यक्त होऊ या’ या कार्यक्रमात ते बोलत होते.लेखिका नयनतारा सहगल यांनी संमेलनासाठी लिहिलेल्या उद्घाटनपर भाषणाचे अभिवाचन या वेळी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुरेश बेरी, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, शब्दधन काव्यमंचचे अध्यक्ष सुरेश कंक आदी उपस्थित होते.डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, सहगल यांचे भाषण रद्द केले़ खरे मात्र यामुळेच त्यांनी लिहिलेल्या भाषणाची सर्वात जास्त प्रसिद्धी झाली. समाजामध्ये काय खदखद सुरू आहे हे संमेलनामधून समजते. कारण संमेलन हा दर्शक बिंदू आहे. अनेक वेळा असे दिसून येते की साहित्य मंडळ हे एकाधिकारशाहीकडे झुकले आहे.प्रा. तुकाराम पाटील म्हणाले, कुठल्याही दबावाखाली येऊन साहित्य मंडळ निर्णय घेत असेल तर लेखकाला उभे राहिलेच पाहिजे. याचाच अर्थ लेखकाने लिहिते झाले पाहिजे. डॉ. सुरेश बेरी म्हणाले, लेखकांना बोलण्याचे, लिहिण्याचे स्वातंत्र्य राहिले नाही. सद्य:स्थितीत वर्तमान हे असह्य होत आहे. कुठल्याही घटकाला आपण सुरक्षित आहोत असे वाटत नाही. सुरेश कंक म्हणाले, सृष्टीमध्ये अनेक बदल घडत आहेत. ज्या समाजामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही तो समाज कधी मोठा होऊ शकत नाही. म्हणून परिवर्तन होत राहिले पाहिजे. दिनेश भोसले, मृण्मयी नारद यांनी संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणाचे अभिवाचन केले. सविता इंगळे यांनी प्रास्ताविक केले.
विचार दाबले तरी नष्ट होत नाहीत- नागनाथ कोत्तापल्ले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 2:02 AM