पुणे : पुणेकरांच्या आवडीच्या डेक्कन क्विनची डायनिंग कार काढून त्याजागी प्रवासी काेच लावण्याचा विचार सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. परंतु यावर अद्याप कुठलाही ठाेस निर्णय झाला नसून येत्या काळात यावर निर्णय हाेण्याची शक्यता आहे.
भारतातील पहिली डायनिंग कार पुणे - मुंबई धावणाऱ्या डेक्कन क्विन या रेल्वेत लावण्यात आली. या डायनिंग कारचे लाखाे चाहते आहेत. या डायनिंग कारमध्ये विविध पदार्थांचा आस्वाद प्रवाशांना घेता येताे. या रेल्वेचा आदर्श घेत भारतातील इतर 17 रेल्वेमध्ये डायनिंग कार तयार करण्यात आली. डेक्कन क्विन या ट्रेनची प्रवासी संख्या देखील खूप आहे. या ट्रेनला वेटिंग सुद्धा माेठ्याप्रमाणावर असते. त्यामुळे ही डायनिंग कार काढून त्याजागी प्रवासी काेच लावण्याचा विचार सुरु आहे. परंतु डायनिंग कार काढण्याआधी प्रवाशांच्या भावनांचा विचार केला जाईल अशी माहिती रेल्वेतील अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
याबाबत बाेलताना रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा म्हणाल्या, डेक्कन क्विन ही जगातील पहिली ट्रेन आहे की ज्या ट्रेनला सर्वप्रथम डायनिंग कार लावण्यात आली. या रेल्वेला डाेळ्यासमाेर ठेवून भारतातल्या 17 रेल्वेमध्ये डायनिंक कार तयार करण्यात आली. सध्या असलेल्या डायनिंक कारमध्ये 32 प्रवासी विविध पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. खरेतर यात वाढ करुन 64 लाेक बसतील अशा आणखी एका काेचची निर्मीती करणे अपेक्षित असताना, आहे तिच डायनिंग कार काढण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. आत्तापर्यंत सहावेळा ही डायनिंग कार काढून टाकण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला हाेता. प्रवासी संख्या अधिक असेल आणि काेच कमी पडत असतील तर डेक्कन क्विन ही 24 काेचची करावी. परंतु या रेल्वेमधील डायनिंक कार कदापी काढता कामा नये. या डायनिंक कारमुळेच या रेल्वेला आणि पुणे स्टेशनला ओळख आहे.