\Sलोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ज्या लोकांची तोंड वर करुन बोलायची हिंमत नव्हती़ ते वाट्टेल ते बोलू लागले, ते सहन होत नव्हते़ व्यवसायात काही चुकीचे निर्णय झाल्याने आर्थिक नुकसान झाले होते़ त्याच्या तणावातून आत्महत्येचा विचार आल्याने घरातून निघून गेलो होतो़ पण बाहेर पडल्यावर कुटुंबाचा विचार मनात आल्याने आत्महत्येचा विचार दूर सारला़ पण पुण्यात परत न येण्याचा विचार होता, असे प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांनी सांगितले़
पुणे पोलिसांच्या पथकाने गौतम पाषाणकर यांना जयपूर येथील चंद्रगुप्त फोर्ट या हॉटेलमधून मंगळवारी ताब्यात घेतले़ त्यांना बुधवारी सायंकाळी पुण्यात आणण्यात आले़ यावेळी पाषाणकर हे पत्रकारांशी बोलत होते़
पाषाणकर यांनी सांगितले की, व्यवसायात काही चुकीचे निर्णय घेतले गेले़ त्यामुळे आर्थिक नुकसान झाले होते़ त्यातून गेल्या २ -३ महिन्यांपासून ताणतणावात होतो़ त्यातून माझ्यावर मानसिक भडीमार झाला़ कुठलीही परिस्थिती साथ देत नव्हती़ किरकोळ रक्कमेसाठी लोक बोलू लागल्याने त्याचा मानसिक त्रास झाला़ ते सहनशीलतेच्या बाहेर होते़ त्यातूनच आत्महत्येचा विचार करुन पुण्यातून कोल्हापूरला गेलो़ तेथून बसने बंगलोर व तेथून तिरुपती बालाजी करीत कन्याकुमारीपर्यंत गेलो होतो़ या प्रवासादरम्यान शांतपणे विचार करत गेलो़ तेव्हा कुटुंबाचा विचार मनात आला़ हे आपले काम नाही, असे मनाने घेतले़ पण पुण्यात परत येण्याचा विचार नव्हता़ त्यामुळे मी बसने फिरत राहिलो़ पोलीस आले नसते तर दुसºया दिवशी आपण उदयपूरला निघून जाणार होतो़
पुण्यातून निघताना ९० हजार रुपये बरोबर घेतले होते़ छोट्या हॉटेलमध्ये मुक्काम करायचा़ साधे जेवण घ्यायचे़ बसने फिरायचे़ खूप विचार करायचा असा दिनक्रम सुरु होता, असे त्यांनी सांगितले़
गौतम पाषाणकर यांचे चिरंजीव कपिल पाषाणकर यांनी सांगितले की, आम्ही स्वतंत्रपणे व्यवसाय करतो़ मी महत्वाच्या निर्णयाच्या वेळी वडिलांचा सल्ला घेतो़ आमची ८०० कोटींची उलाढाल होती़ आम्ही मोटारीची डिलरशीप बंद झाली़ त्या कठीण काळामधून बाहेर पडलो होतो़ पण वडिलांनी त्यांच्या आर्थिक अडचणी, मानसिक स्थितीची कधी माहिती दिली नाही़ त्यांना आता व्यवसायातून तुम्ही रिटायर व्हा़ पुढील ६ महिन्यात सर्व स्थिरस्थावर करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले़