लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोविडच्या काळात सकारात्मक विचारांची खूप चर्चा झाली; पण नेहमीच सकारात्मक राहिले पाहिजे, असे नाही. नकारात्मक भावनादेखील जगण्याची समृद्धता वाढविते; पण त्याचे परिवर्तन झाले पाहिजे. जे आपल्याला वाचून, पाहून व ऐकून घडते. कृती करीत असताना भावना व विचारदेखील महत्त्वाचा असतो. भावनेतून विचार अन् विचारांतून कृती घडावी, असे विचार ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी मांडले.
डॉ. विजय देशमुखलिखित ‘ट्रान्स्फॉर्म लाइफ’ या मराठी अनुवादित पुस्तकांचे रविवारी सायंकाळी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी डॉ. मोहन आगाशे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मंजूळ प्रकाशनचे चेतन कोळी, लेखक डॉ. विजय देशमुख, डॉ. सोनाली देशमुख आदी उपस्थित होते. डॉ. आगाशे म्हणाले, ‘ट्रान्स्फॉर्म लाइफ’ या पुस्तकात ४८ सूत्रे मंडळी आहेत. ती रोज एक वाचा; पण केवळ विचार करू नका, तर कृतीदेखील करा. सर्वांत छोटे आयुष्य हे तीव्र भावनेचे असते. त्याच्यापेक्षा जास्त विचारांचे आयुष्य असते आणि त्याहून जास्त आयुष्य असते, ते कृतीचे. त्यामुळे कृती महत्त्वाची ठरते.
विजय बाविस्कर म्हणाले, विचार हा परिवर्तनाचा मूलमंत्र आहे. जीवनाच्या तत्त्वज्ञानाचे परिर्वतनात रूपांतर झाले पाहिजे. डॉ. विजय देशमुखांनी लिहिलेल्या या पुस्तकांत परिवर्तनाचा विचार मांडला आहे. ते दातांचे डॉक्टर आहेत. दातांचे नाते सौंदर्याशी आहे. सौंदर्याचे नाते संवेदनांशी आहे. संवेदनांचे नाते वेदनेशी आहे अन् वेदनेचे नाते विचारांशी आहे. विजय देशमुख म्हणाले, गेल्या ३० ते ४० वर्षांपासून वाचनाची आवड आहे. वाचनात रमतो तर, लेखनातून ध्यान करतो. आयुष्यात बदल घडण्यासाठी एक विचारदेखील पुरेसा ठरतो. पुस्तकाच्या प्रत्येक पानातून वाचकांना काही तरी मिळायला हवे. यावेळी पुणेरी पगडी घालून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक चेतन कोळी यांनी केले. सूत्रसंचालन अक्षय वाटवे यांनी केले. डॉ. सोनाली देशमुख यांनी पुस्तकातील निवडक भागाचे अभिवाचन केले.
.....
एकांत हे तर विचारांचे पर्यटन स्थळ : प्रा मिलिंद जोशी
कोरोनापूर्वी आपण केवळ स्वतःसाठी धावत होतो. त्या धावण्यातून विवेक हरवला होता. आता परिस्थिती बदलली आहे. निराशेच्या पोटातदेखील आशेचा किरण आहे. सगळीकडे केवळ अंधाराच्या पारंब्यांच आहेत, असे नाही. त्या पारंब्यांतून प्रकाशाचे कवडसेदेखील आहेत. त्यांचा विचार करा. आपल्या मनात नेहमी सकारत्मक विचारांची आरास करा. या पुस्तकात सकारात्मक विचार मांडले आहेत. त्यांचा आनंदाने स्वीकार करा. आपल्या दुःखांना सजवू नका. एकांत म्हणजे एकटेपणा नाही. एकांत हे तर विचारांचे पर्यटन स्थळ आहे. त्याच्या भेटीला जावे, असे विचार प्रा. मिलिंद जोशी यांनी मांडले.
फोटो ओळी : पुस्तक प्रकाशनप्रसंगी डावीकडून चेतन कोळी, लेखक डॉ. विजय देशमुख, प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, विजय बाविस्कर, डॉ. सोनाली देशमुख.