पुणे : पुणे शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. जानेवारी ते ३० जून २०२४ पर्यंत एक हजाराहून जास्त गुन्ह्यांचे अर्ज सायबर पोलिसांकडे दाखल झाले आहेत. यामध्ये ९८ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे.
पुणे पोलिसांच्या सायबर शाखेकडे गेल्या अनेक महिन्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, यावर अजूनही तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीमध्ये शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याबाबत काळजी घेणे, सावधानता बाळगणे आणि सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
तब्बल १ हजाराहून अधिक तक्रार अर्ज प्रलंबित
गेल्या सहा महिन्यांत सायबर फसवणुकीच्या एकूण १८९४ तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या आहेत. त्यातील ६६९ तक्रारींची दखल घेण्यात सायबर पोलिसांना यश मिळाले आहे.
शेअर ट्रेडिंगमध्ये फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे गेल्या ६ महिन्यांत एकूण ४५९ गुन्हे सायबर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये एकूण ६४ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे.
दररोज सरासरी १ कोटीची फसवणूक
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियाचा वापर करून सायबर चोरटे नागरिकांना लक्ष्य करीत आहेत. सायबर फसवणुकीला बळी पडून दररोज सुमारे १ कोटीची फसवणूक होत असल्याचे मागील एक महिन्याच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.