पुणे : ‘म्हाडा’च्या ५६५ जागांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील परीक्षा रविवारी (दि. १२) रोजी होणार हाेती. यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उपअभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (स्थापत्य) आणि सहायक विधी सल्लागार आदी पदांची सकाळची सत्रात परीक्षा होणार होती. तर दुपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता या पदाची परीक्षा होणार होती. मात्र, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अचानकपणे ही परीक्षा रद्द करत असल्याचे जाहीर केल्याने पुणे शहरात विविध केंद्रावर परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
‘म्हाडा’ने विविध पदांच्या एकूण ५६५ जागांसाठी परीक्षा घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. १२ डिसेंबर, १५ डिसेंबर आणि १९ डिसेंबर या तीन दिवशी त्या-त्या पदानुसार परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या परीक्षांची राज्यातील लाखो विद्यार्थी तयार करत होते. पहिल्या टप्प्यातील परीक्षा रविवारी होणार असल्याने पुणे शहरातील विविध केंद्रावर शेकडो विद्यार्थी आले होते. मात्र, रात्रीत परीक्षा रद्द झाल्याचे कळाल्याने या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.