पुणे : गरोदर माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी गर्भवती महिला व स्तनदा माता यांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अनुदान जमा केले जाते. पुणे विभागात आतापर्यंत अशा गरोदर व स्तनदा मातांच्या बँक खात्यामध्ये तब्बल एक हजार कोटी रुपयांचे अनुदान जमा झाले आहे.
शहरी व ग्रामीण भागातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील गरोदर मातांना पुरेसा पोषण आहार मिळावा यासाठी शासनाने ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजना सुरू केली. या अंतर्गत प्रत्येक नोंदणीकृत गरोदर महिलेला तीन टप्प्यांत पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
या योजनेंतर्गत पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात ८९ कोटी ४८ लाख ५९ हजार रुपये, सातारा जिल्ह्यात २७ कोटी १४ लाख ४२ हजार रुपये तर, सोलापूर जिल्ह्यात ३९ कोटी ६२ हजार रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे.
चौकट
विशेष मोहिमेद्वारे नावनोंदणी
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने १ ते ७ सप्टेंबर दरम्यान विशेष सप्ताहाचे आयोजन केले आहे. या वेळी पात्र लाभार्थींनी आपल्या कार्यक्षेत्रातील आशा कार्यकर्त्या, एएनएम, अंगणवाडी कार्यकर्ती यांच्याकडे लाभार्थी व तिच्या पतीचे आधारकार्ड, आधार संलग्न बँक, पोस्ट खाते, माताबाल संगोपन कार्ड, बाळाचे जन्मनोंदणी प्रमाणपत्र आदी कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.