खेड (शेलपिंपळ्गाव) : ढोल ताशांचा गजर... भानोबा देवाचे मंदिराबाहेर आगमन...त्याक्षणी दानवांची युद्धाला सुरुवात... देवाच्या नजरेला नजर... आणि क्षणार्धात दानव मूर्च्छित होऊन जमिनीवर कोसळले... भानोबा देवाचा दानवांना स्पर्श... देवाचा गजर... आणि दानवांना संजीवनी मिळाली... ऐशी भानोबाची ख्याती ! प्रतिवर्षी येती उत्सवासी !! भक्तिभावे पुजता त्यासी ! दु:ख दैन्य निवारी !! कोयाळी - भानोबाची (ता. खेड) येथे हजारो भाविकांनी देव - दानव युद्धाचा असा थरार अनुभवला. भानोबा देवाच्या उत्सवानिमित्त कोयाळी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा हा दिन भानोबा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. पूर्वी शिवभक्त भानोबा देवाला तस्करांनी कपट करून मारले होते. एक दिवस माझ्यासाठीही तुम्हाला मरावं लागेल असा शाप त्यावेळी भानोबानं दिला होता. त्यामुळे भानोबा देवाच्या शापानुसार तस्करांना आजही देवाशी युध्द करावे लागत असल्याची सत्यस्थिती आहे. श्री. भानोबाच्या स्वागतासाठी गावातील स्थानिक ग्रामस्थांनी जय्यत तयारी करून मोठ्या उत्साहात देवाचे स्वागत केले. यावेळी देवाच्या स्वागत सभारंभाला भाविकांची संख्या लक्षणीय होती. बुधवारी व गुरूवारी देव - दानावांमध्ये रंगलेले हे युद्ध स्वत: नयनांनी पाहण्यासाठी तसेच देवाच्या दर्शनासाठी दोन दिवसात हजारो भाविकांनी कोयाळीत हजेरी लावली. तत्पर्वी, आज पहाटे भानोबा देवाची विधिवत अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर देवाचा पोवाडा घेण्यात आला. सकाळी साडे अकरा ते एक यावेळेत देव - दानव युद्ध झाले. दोन दिवसात एकूण १०७६ भाविकांनी युद्धात सहभाग घेतला होता. भानोबा देवाची महारती घेऊन देवाच्या दर्शनाला दर्शनबरीतून सुरुवात झाली. उत्सवात अखेरीस कुस्त्यांचा जंगी आखाडा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील नामांकित मल्लांनी आखाड्यामध्ये सहभाग घेतला होता. उत्सवात मनोरंजन कार्याक्रमची मोठी रेलचेल ठेवण्यात आली होती. शुक्रवारी (दि. २९) सकाळी ६ ते ७ भानोबा देवाचा ओलांडा व देवाचे राहुटी मंदिरातून जन्मस्थ मंदिरात आगमन, त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ७ भानोबादेव आपल्या आजोळी प्रयाण करेल. त्यांनंतर कुसेगावकरांना भावपूर्ण निरोप दिला जाईल. दरम्यान भानोबाच्या तीन दिवसीय उत्सवात जिल्हा परिषद सदस्या निर्मला पानसरे, माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय मोहिते, उद्योजक राजेंद्र गायकवाड आदिंसह विविध राजकीय पक्षाच्या मुख्य पदाधिका?्यांनी हजेरी लावली. तीन दिवसीय उत्सव पार पडण्यासाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच सर्व ग्रामस्थांचे महत्वपूर्ण योगदान लाभले. यात्रेदरम्यान आळंदी पोलीस ठाण्याअंतर्गत सुमारे ९० कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
* देव आणि तस्कर या दिनाच्या प्रतिपदेला विशेष महत्व असल्याने संपूर्ण राज्यातून भानोबाचे भक्त या दिवशी उपवास करून कोयाळी येथे देवाबरोबर युद्ध खेळायला येत असतात. यावर्षी पहिल्या दिवशी ५२५ व दुसऱ्या दिवशी ५५१ जणांनी युद्धात सहभाग घेतला होता..
................
* भानोबा देव मंदिराबाहेर पडल्यानंतर मानवरूपी दानवने आपल्या हातातील शस्त्र (काठी) देवासमोर फिरवून उड्या घेतल्या. मात्र देवाच्या नजरेला नजर पडल्यानंतर ते त्याक्षणी जमिनीवर पडले. दरम्यान त्यांना देवाचा स्पर्श देण्यात आला. त्यानंतर पडलेल्या तस्करांच्या कानात उपस्थित तरुण भाविकांनी जोरजोरात भानोबाचा जयघोष करून त्यांना संजीवनी दिली.