लोकमत न्यूज नेटवर्क
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत सफला एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे, एकादशीनिमित्त रांजणगाव - गणपती (ता. शिरूर) येथील पाचुंदकर कुटुंबीयांनी मुख्य मंदिरातील गाभाऱ्याला विविध पान-फुलांची आकर्षक सजावट केली होती.
माऊलींना पवमान अभिषेक व दुधारती घालून पहाटेच्या सुमारास महापूजा पूजा पार पडली. दुपारी बाराला माऊलींना महानैवेद्य देण्यात आला. दरम्यान, एकादशीच्या मुहूर्तावर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची सकाळपासूनच रीघ लागली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देवस्थानकडून नियमावलींचे पालन करून भाविकांना मास्क, सॅनिटायझर व शारीरिक अंतर ठेवून मंदिरात दर्शनबारीतून प्रवेश दिला जात होता. दिवसभरात सुमारे दहा हजारांहून अधिक भाविकांनी माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतल्याची माहिती व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.
फोटो ओळ : सफला एकादशीनिमित्त माऊलींच्या मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात विविध पान - फुलांची केलेली आकर्षक सजावट.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)