पुणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिकेने शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत. तरी देखील काही नागरिक आणि आस्थापना या नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. अशा नियमभंग करणाऱ्यांवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात असून, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय आणि कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाने केलेल्या कारवायांमध्ये ५६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे़
शहरात सध्या विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे़ यामध्ये शहर स्वच्छता व नियोजन कायद्यांतर्गत अस्वच्छता आणि उपद्रव निर्माण करून गैरसोय करणे या अधिनियमान्वये व साथरोग नियंत्रण कायद्यानुसार अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करून दंड वसूल करण्यात येत आहे़ यानुसार धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाने थर्मो टच इंडिया प्रा. लि. येथे कारवाई करून त्यांचाकडे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी न केल्यामुळे १५ हजार रूपये आणि मायक्रो इंडिया इंजिनिअरिंग लि. यांच्याकडून १० हजार रूपये अशा एकूण २५ हजार रुपये दंड वसुलीची कारवाई केली आहे़
तर कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एस पी कॉलेजच्या मागील स्टार लाईट सोल्युशन या खासगी वित्तीय संस्थेचे कार्यालय सुरू असल्याचे समजल्यावर तेथे जाऊन थेट सदर आस्थापनेविरुध्द कारवाई करून ३१ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे़
---------------------------