वडगाव निंबाळकर : येथे नीरा डाव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. हे पाणी वाहत येऊन नीरा-बारामती राज्य मार्गावर साचत आहे. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था होऊ लागली आहे. संबंधित विभागाने पाण्याची गळती रोखावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.सध्या नीरा डाव्या कालव्यातून आवर्तन सुरू आहे. सोमेश्वरनगर ते वडगाव निंबाळकरच्यादरम्यान कालव्याच्या भरावातून पाणी पाझरून अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत आहे. यामुळे कालव्यातून रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही गळती होत आहे. पाण्याची गळती होऊन पाणी नीरा-बारामती रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे रस्ता खराब होत चालला आहे. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पाण्याची भीषण टंचाई एवढी गंभीर परिस्थिती उद्भवलेली असतानाही लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे मात्र संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)
कालव्यातून हजारो लिटर पाणी गळती
By admin | Published: January 04, 2016 1:06 AM