राजू इनामदार - पुणे : महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घनघोर संग्राम असलेल्या पानिपत युद्धावर आधारित ‘पानिपत’ या चित्रपटासाठी इतिहास संशोधक म्हणून पुण्यातीलच पांडुरंग बलकवडे यांनी काम केले आहे. पेशवेकाळाचा विशेष अभ्यास असलेल्या पानिपताशी संबंधित पेशवे दप्तरातील हजारभर मूळ मोडीतील पत्रांचा अभ्यास केला आहे. सलग काही तासांच्या चर्चेनंतरच अभ्यासपूर्वक चित्रपटाती ल ऐतिहासिक घटनांचा पट संहितेत तयार झाला असल्याचे त्यांनी सांगितले.बलकवडे म्हणाले, गोवारीकर यांचा फोन आला त्या वेळी मी या कामासाठी नाही, असेच सांगितले होते. मात्र, माझ्याशी बोलण्यापूर्वीच त्यांनी ‘पानिपत’चा बराच अभ्यास केल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानंतर बोलताबोलता विषय वाढतच गेला. त्यानंतर त्यांनी मलाच ‘पानिपत’साठी ऐतिहासिक संदर्भ देण्यास सांगितले. त्यासाठी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. त्यांच्याबरोबर अनेक बैठका झाल्या. काही दिवसांचे होईल इतके तास रेकॉर्डिंग झाले. प्रत्येक घटनेतील अनेक बारकावे ते विचारत असत. शंका असतील त्याचे निरसन करून घेत. या विषयाची पूर्ण ऐतिहासिक माहिती त्यांनी घेतली. समाधान झाल्यानंतर संहितेमध्ये इतिहासाचा आधार आहे, असे काही बदल केले. चुकीचे काहीही यायला नको यासाठी त्यांचा सतत आग्रह असे.इतिहासाशिवाय आणखी काय काय संदर्भ दिले असे विचारले असता बलकवडे म्हणले, ‘पानिपत’मध्ये मराठ्यांशिवाय अफगाण, रोहिले असे अन्य समाजघटकही सहभागी होते. ते दिसत कसे असतील हा मोठा प्रश्न होता. अहमदशहा अब्दाली किती उंच असेल, त्याचा रंग कसा असेल, दिसण्यास तो कसा असेल, असे अनेक प्रश्न होते. त्यालाही इतिहासाचा काही आधार असावा असा गोवारीकरांचा आग्रह होता. त्या काळाचा त्यावेळी झालेल्या काही लेखनाचा अभ्यास करून या सगळ्या गोष्टी निश्चित केल्या गेल्या आहेत. त्यात शस्त्रास्त्रे, दागिने, पेहराव अशा अनेक गोष्टी आहेत. त्यासाठी स्वतंत्र विभाग होते, मात्र त्यांनाही काम करताना इतिहासाचा आधार हवा होता, तो मला देता आला.तुम्ही स्वत: काय अभ्यास केला? असे विचारले असता बलवकडे यांनी पेशवे दप्तरात पानिपतासंबंधी हजारो कागदपत्रे आहेत असे सांगितले. ते म्हणाले, त्यातील काही निवडक कागदपत्रेच आतापर्यंत शेजवलकर, सरदेसाई अशा थोर इतिहासकारांनी परिश्रमपूर्वक प्रसिद्ध केली आहेत. त्याचा उपयोग झाला आहे. त्याशिवाय अद्यापि अप्रकाशित अशी ४०० पेक्षा जास्त पत्र मी स्वत: वाचली. काही जुन्या गोष्टींवर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच, काही नव्या गोष्टींवर प्रकाश पडला. हे सगळे मुळातून वाचल्यामुळे पानिपत म्हणजे नक्की काय झाले याचे स्पष्ट चित्र डोळ्यांसमोर उभे होते. ते गोवारीकर यांना सांगता आले.गोवारीकर यांचा किंवा एकूणच हिंदी चित्रपटासाठी काम करण्याचा अनुभव कसा होता? यावर बलवकडे म्हणाले, अत्यंत चांगला अनुभव होता. मला स्वत:ला हे काम करायचे नव्हते, मात्र त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांचा या विषयाचा आग्रह फक्त व्यवसायासाठी म्हणून नाही हे लक्षात आले. इतिहासात घडून गेलेली, २५० पेक्षा जास्त वर्षे झालेली व तरीही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून असलेली, तत्कालीन हिंदुस्थानचा इतिहास बदलणारी एक घटना त्यांना पडद्यावर जिवंत करायची होती व त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी होती. त्यांचे विषयाबरोबर असे एकरूप होणे मला आवडले व पटले म्हणून काम केले. ते करताना निश्चितच आनंद मिळाला.......पानिपत मोहिमेचा खर्च ९२ लाखपानिपत चित्रपटावर काही कोटी रुपये खर्च झाले असले तरी प्रत्यक्ष पानिपत युद्धावर मात्र त्याकाळी म्हणजे २५८ वर्षांपूर्वी ९२ लाख रूपये व वर काही हजार रुपये खर्च झाला आहे. पेशवे दप्तरात या मोहिमेचा ताळेबंद तारीखनिहाय मांडला असल्याचे बलकवडे यांनी सांगितले. १३ मार्च १७६० मध्ये परतूर येथून ही मोहीम सुरू झाली व १४ जानेवारीच्या घनघोर युद्धानंतर १५ जानेवारी १७६१ रोजी संपली. या काळातील संपूर्ण जमाखर्च या पेशवे दप्तरात असल्याची माहिती बलकवडे यांनी दिली.
हजारभर मोडी पत्रांतून साकारला ' पानिपत ' : पांडुरंग बलकवडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 12:30 PM
‘पानिपत’ या चित्रपटासाठी हजारभर मूळ मोडीतील पत्रांचा अभ्यास
ठळक मुद्दे‘पानिपत’चे इतिहासकार : पेशवे दप्तरातील हजारभर पत्रांचे वाचनपानिपत मोहिमेचा खर्च ९२ लाख