- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : माता मृत्यू, अर्भक मृत्यू कमी करण्यासाठी जननी सुरक्षा योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आत्तातपर्यंत जिल्ह्यात ११ हजार ८४० महिलांना प्रोत्साहनपर अनुदान दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली.या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती-जमाती व दारिद्र्यरेषेखालील गरोदर महिलांची प्रसूती करण्यात येते. गरोदर महिला घरी बाळंत झाल्यास दारिद्र्यरेषेखालील महिलेला ५०० रुपये, संस्थेत बाळंत झाल्यास ग्रामीण भागात ७०० रुपये, शहरी भागात ६०० रुपये तसेच सिझरीन झाल्यास १,५०० रुपये देण्यात येतात. ग्रामीण भागात आरोग्यसेवा नसल्याने प्रसूतीदरम्यान मातेचा मृत्यू होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. यामुळे राज्य शासनाने २००६मध्ये गरोरद मातांसाठी जननी सुरक्षा योजना सुरू केली आहे. - शासनाद्वारे अनुदानाची रक्कम आधार कार्डद्वारे थेट बॅँक खात्यामध्ये जमा केली जाते. जननी सुरक्षा योजनेअतंर्गत मिळणारी अनुदानाची रक्कम खूपच कमी आहे. ही रक्कम वाढविण्याची गरज आहे. ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील अनेक महिलांकडे बॅँक खाते आणि आधार कार्ड नाही. अशांची प्रसूती होऊनही त्या देय अर्थसाह्यापासून वंचित राहतात़आत्तापर्यंत जिल्ह्यातील १४ हजार ८३ मातांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी ११ हजार ८४० मातांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. या वर्षी आरोग्य विभागाने जवळपास ८४ टक्के अनुदानाचे वाटप केले आहे. गेल्या वर्षी फक्त ६१ टक्के अनुदानाचे वाटप करण्यात आले होते. - डॉ. भगवान पवार, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद