पुणे : लोकसभेमध्ये भाजपला राज्यात महाविकास आघाडीकडून चांगलाच धक्का बसला. पण आता विधानसभेसाठी भाजप खास रणनिती तयार करणार असून, आज रविवारी पुण्यात बालेवाडी येथे अधिवेशन घेण्यात येत आहे. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुपारी मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी हजारो कार्यकर्ते बालेवाडीत दाखल झाले आहेत.
बालेवाडीचे स्टेडीयम भाजपमय झाले असून, सर्वत्र मोठमोठे फलकही लावले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन आज पुण्यात होत आहे. या अधिवेशनासाठी सकाळपासूनच कार्यकर्ते आणि पदाधिकारी दाखल झाले आहेत. आहे. अमित शहा देखील शनिवारी रात्रीच पुण्यात आले असून, त्यांनी अनेकांच्या भेटीगाठी देखील घेतल्या आहेत.
या अधिवेशनाची 'संघटन हीच शक्ती मनामनात राष्ट्रभक्ती' ही टॅगलाईन आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आपले संघटन मजबूत करण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे, हे यातून स्पष्ट होत आहे. अधिवेशनाला शहा यांच्यासोबतच राष्ट्रीय आणि राज्यातले प्रमुख नेते उपस्थित झाले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीची दिशा काय असेल, रणनिती काय असेल यावर अधिवेशनात शहा मार्गदर्शन करतील. अधिवेशनिला राज्यातून पाच हजारहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहिले आहेत. या अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवनकुळे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मार्गदर्शन करतील. या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या बोलण्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपने चांगलाच मार खाल्ला होता, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर शहा नक्की काय रणनिती सांगतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शरद पवार यांच्याविषयी आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी ते काही बोलतात का? ते देखील पहावे लागणार आहे. विरोधकांवर टीका करतात की, केवळ रणनितीवर लक्ष देतात, ते लवकरच समजणार आहे.