जेजुरी: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीत आज सोमवती यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी सात वाजता देवाच्या उत्सवमूर्तींच्या पालखी सोहळ्याने उगवत्या सूर्याच्या साक्षीने कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान ठेवले. यावेळी भंडार खोबऱ्याच्या उधळणीत, सदानंदाचा जयघोष करण्यात आला.बंदुकीच्या फैरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली.
काल, रविवारी दुपारी २ वाजून ४४ मिनिटांनी अमावस्येचा प्रारंभ झाला. आज सोमवारी दुपारी २ वा ५६ मी.पर्यंत अमावास्येचा पर्व काळ असल्याने जेजुरीत सोमवती यात्रा भरली होती. सूर्याला सोमवती अमावस्या असल्याने याच पर्वकाळात देवाच्या उत्सवमूर्तींना कऱ्हा स्नान करणे आवश्यक असल्याने आज सकाळी ७ वाजता खंडेरायाची उत्सव मूर्तींची पालखी सकाळी कऱ्हा स्नानासाठी काढण्यात आली. खंडेरायाचे मानकरी पेशवे, खोमणे, माळवदकर आदिंनी इशारत केल्यानंतर खांदेकरी मानकऱ्यांनी उत्सवमूर्तींची पालखी उचलली. मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी बालदारीत आणण्यात आली. देवाच्या पुजारी सेवकांनी उत्सवमूर्ती पालखीत ठेवल्यानंत सोहळ्याने गडकोटाबाहेर प्रस्थान ठेवले.
दिवाळी सण, कालचे लक्ष्मी पूजन आणि सकाळीच सोहळ्याचे प्रस्थान राहिल्याने सोहळ्यात भाविकांची गर्दी कमी होती. सोमवती यात्रेचे नियमित वारकरी, ग्रामस्थ मंडळी यांनी सोहळ्यात हजेरी लावली होती. यावेळी देव संस्थान चे प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे, विश्वस्त मंगेश घोणे, अड् पांडुरंग थोरवे, अड् विश्वास पानसे, डॉ.राजेंद्र खेडेकर, अनिल सौन्दडे मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे, आदी कर्मचारी उपस्थित होते. दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास कऱ्हा स्नान होणार आहे