पुणे : पुणे व्यापारी महासंघ, युनायटेड रिटेल ट्रेड गारमेंट असोसिएशन व पुणे सराफ असोसिएशन यांच्यातर्फे लक्ष्मीरोड नामकरण होऊन १०१ वर्षे पूर्ती झाली आहे. त्यामुळे यंदा लक्ष्मीरोड, कुमठेकर रोड व बाजीराव रोड परिसर असा सुमारे ३ किमी रस्त्यावर विद्युत रोषणाई केली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार व पोलीस उपायुक्त-झोन १ संदीपसिंग गिल यांच्या हस्ते होणार आहे.
लक्ष्मी रस्त्यावर गेल्यानंतर संपूर्ण रस्त्यावर लखलखाट झाला आहे. याचे उद्घाटन राका ज्वेलर्स प्रा. लि. लक्ष्मीरोड शोरूम जवळ, उंबऱ्या गणपती चौक येथे ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे, अशी माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद राका यांनी कळविली आहे. दुचाकीवरून लक्ष्मी रस्त्यावरून जाताना अनेक नागरिकांनी या लखलखाटीचे फोटो, व्हिडीओ काढले आहेत. त्यामुळे हा लक्ष्मी रस्त्यावरील लखलखाट कौतुकाचा विषय ठरला आहे.