पुणे : पुण्यात बघतोय रिक्षावाला संघटनेच्या वतीने पुन्हा बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे. आरटीओजवळ हजारॊ रिक्षाचालक रस्त्यावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. आंदोलनात जवळपास १० हजार रिक्षाचालक सहभागी झाल्याचे संघटनेने यावेळी सांगितले आहे.
राज्य सरकारसरकार आणि प्रशासन यांनी बाईक टॅक्सी बेकायदा आहे. हे त्यांनी प्रेस नोट देऊन मान्य केलेले असून सुद्धा प्रत्यक्षात प्रशासन ओला/ उबेर / रॅपीडो सारख्या कॅब ऍग्रीगेटर कंपन्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास धजावत नाही. ते फक्त जे युवक बाईक टॅक्सी व्यवसाय करत आहेत, त्यांनाच वेठीस धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत. परंतु ज्या मोठमोठ्या कंपन्या या युवकांना फसवून,या बेकायदा व्यवसायामध्ये आणत आहेत. त्यांच्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासनाने केलेली नसून, त्यांच्यावर साधा एक रुपयाचा दंड सुद्धा लावलेला नाही. परंतु बेकायदा बाईक टॅक्सी चालवणाऱ्या गरीब युवकांना हजारो रुपये दंड हे सरकार आणि प्रशासन लावत असल्याचा आरोप बघतोय रिक्षावाला यांनी सरकरावर केला आहे.
''हे सरकार आणि प्रशासन या बेकायदा बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपन्यांबरोबर सामील असून, गोरगरीब रिक्षाचालक आणि बेकायदा बाईक टॅक्सीच्या जाहिरातींना बळी पडणाऱ्या युवकांच्या आयुष्याशी खेळत असल्याचे ते म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी 4 जानेवारी रोजी, आठ दिवसात बाईक टॅक्सी बंद करण्याचे आश्वासन दिले होते. आता जवळपास सव्वा महिना उलटून गेला तरीही बाईक टॅक्सी सर्रास चालू आहे, याचा निषेध म्हणून बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात आंदोलन सुरु केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.''