लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळेच मास्क, सॅनिटायझर यांची चर्चा सुरू आहे. मात्र, तरीही जिल्ह्यात लाखभर प्रवासी व रोजचे हजार चालकवाहक विनामास्क काही लाख किलोमीटरचा प्रवास करत आहेत. त्यांना सर्वांना मास्क तसेच सॅनिटायझर दिले असल्याचा प्रशासनाचा दावा आहे, पण त्याचा वापर करताना मात्र एकाही स्थानकावर अपवाद वगळता कोणीही दिसत नाही.
शहरात तीन मोठी स्थानके आहेत. जिल्ह्यात तालुकास्तरावर १३ स्थानके आहेत. या सर्व ठिकाणी प्रवाशांची गर्दी असते. त्यातील फारच थोड्यांनी मास्क लावलेले दिसतात. बहुतेकजण विनामास्कच स्थानकात फिरताना दिसतात. त्यांना कोणी हटकले तर त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते व त्याने काय होणार आहे, असा प्रतिप्रश्न केला जातो.
प्रवाशांची ही तऱ्हा तर चालक-वाहकही विनामास्कच दिसतात. अगदीच अपवाद म्हणून एखाद्या चालक-वाहकाने मास्क लावलेला दिसतो. त्यांनाही विचारले तर किती काळ ठेवणार चेहऱ्यावर, श्वास गुदमरतो असे उत्तर दिले जाते. चालक-वाहक दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी जात-येत असतात. त्यातही प्रवासी आणि वाहक यांच्यात तिकीट काढताना संपर्क येतोच, पण त्याची काळजी ना वाहकाकडून घेतली जाताना दिसते ना प्रवाशाकडून. जागा मिळवण्याच्या धडपडीत गर्दी होणे हे तर प्रत्येक स्थानकावरचे नित्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात बाहेरून दिवसा व रात्री मिळून काही हजार गाड्या येतात व जातात. त्याशिवाय जिल्ह्यातील ८५० गाड्यांच्या काही लाख किलोमीटरच्या फेऱ्या होतात. नियमित प्रवास करणारेही काही प्रवासी आहेत. टाळेबंदीनंतर एसटी सुरू केली त्या वेळी ५० टक्केच प्रवासी घ्यावेत, असा नियम केला होता. मात्र काही दिवसांतच तो मागे घेतला गेला. त्याच वेळी एसटी व आसनही सॅनिटायझरने स्वच्छ करावे असे सांगण्यात आले होते. त्याचाही विसर पडलेला दिसतो आहे.