पुणे :पोटाची भूक ही अनेकदा माणसाला काहीही करायला भाग पाडते असं म्हटलं जात. याच भुकेसाठी अर्थात नोकरीसाठी पुण्यातील रेसकोर्स मैदानावर थोडे थोडके नव्हे तर हजारो तरुणांनी रस्त्यावरील कुडकुडणाऱ्या थंडीत रात्र काढली. केवळ मैदानावर नव्हे तर आजूबाजूच्या रस्त्यावरही हे तरुण मिळेल त्या जागी भर थंडीत पडून राहिले. पावसाने मारलेली दडी, कमी झालेल्या नोकऱ्या आणि त्यातचं निघालेली टेरिटोरियल आर्मीची भरती प्रक्रिया यामुळे तरुणांची गर्दी झाली नसती तरचं नवल होते. लष्कराच्या मराठा लाईट इन्फ्रंट्री या प्रादेशिक सेनेच्या १०१ इन्फ्रंट्री बटालियनच्या माध्यमातून आजपासून १२ जानेवारीपर्यंत विविध १०९ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण दाखल झाले असून त्यांना कोणत्याही सुविधेअभावी उघड्यावर रात्र काढण्याची वेळ आली आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश अशा सर्व भागातून तरुण रविवारी पुण्यात दाखल झाली. थोडेथोडके नव्हे तर सात हजारांपेक्षा अधिक तरुण अवघ्या १०९ जागांसाठी घाम गाळत आहेत.इथे जवळपास कोणतीही खाण्याची सोय नसल्याने हे तरुण उपाशीपोटीराहून अडीच किलोमीटर पळत आहे. याबाबत एकाने लोकमतला सांगितले की, आम्ही माणसं आहोत, खाण्यापिण्याची नाही निदान स्वच्छतागृहाची तरी करायला हवी. गावाकडे आमच्याकडे खायला नाही आणि शहरात आम्हाला नोकरी नसल्याची हताश प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.
नोकरीच्या आशेने हजारो जीव कुडकुडणाऱ्या थंडीत रस्त्यावर झोपतात तेव्हा... !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 4:24 PM