दरमहा होतो दहा हजारांपर्यंत खर्च : परदेशी जातींना प्राधान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एकेकाळी शेतात रमणारा, भाकरी दिल्यानंतर घराच्या अवतीभवती घुटमळणारं कुत्रं आता बंद फ्लॅॅटमध्ये आणि बंगल्यांच्या संस्कृतीमध्येही रुळले आहे. घरातल्या लहानग्यांना, वृद्धांना सोबत म्हणून किंवा हौस म्हणून कुत्रं पाळण्याचा ‘ट्रेंड’ नवश्रीमंतांसोबतच मध्यमवर्गीयांमध्येही दिसत आहे. पाळलेल्या कुत्र्यांना आरामदायी आयुष्य मिळावं यांचीही काळजी मालक घेत आहेत.
उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत कुटुंबात तर दीड ते तीन लाख रुपयांपर्यंतची किंमत मोजून कुत्री खरेदी केली जात आहेत. नावाजलेल्या प्रजातीचे कुत्रे खरेदी करून त्यांना ‘डॉग शो’त उतरवण्यासाठी त्यांच्या प्रशिक्षणासह, पार्लरवर देखील लाखो रुपये खर्च केले जात आहेत. यात आता मध्यमवर्गीय कुटुंब देखील मागे नाहीत. गेल्या तीन ते चार वर्षांत मध्यमवर्गीय कुटुंबांमधले कुत्रे पालनही वाढले आहे. सुमारे तीस हजार रुपयांपर्यंतची किंमत त्यासाठी मोजली जात आहे.
अनेक कुटुंबांत सुरक्षा, सोबत यापेक्षाही ‘फॅशन’, ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून कुत्रे पालनाकडे पाहिले जात आहे. लॉकडाऊनपासून तर कुत्रा खरेदी वाढल्याचे दिसत आहे. आयटी आणि कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये व्यस्त असणारी जोडपी पालकत्वाची हौस भागवण्यासाठी मुलापेक्षा कुत्रा पाळण्यास प्राधान्य देऊ लागली आहेत. मुलाच्या संगोपनावर जितका खर्च केला जातो जवळपास तितकाच खर्च ‘पपीज’वर केला जातो. कुत्र्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे, तो आनंदी राहावा यासाठी वैद्यकीय सल्लाही घेतला जातो.
चौकट
कुत्र्यांसाठीचा ‘मेन्यू’
पपी लार्जेब्रीड : पिल्लांचे डोळे व रंग तजेलदार होण्यासाठी
चिकन मिल्क व बिस्किट : डोळे उघडलेल्या पिल्लांसाठी
कॅल्शियम बोन : दात, जबडा, हाडे घट्ट दणकट होण्यासाठी
पपी विलिंग : केसाळ पिल्लांच्या शरीराची चमक वाढणे, डोळे पाणीदार होण्यासाठी
डॉग फूड - नियमित खाद्य
चौकट
या प्रजातींना प्राधान्य
जर्मन शेफर्ड, लॅॅब्रेडॉर, डॉबर मॅन, पिंचर (गोल्डन रिटिव्हर), ग्रेट डॅॅन, पग, पिट बुल्स, रॉटविलर, मुधोळ हाऊंडस्, गावठी
चौक
...यासाठी मोजतात लाखो रुपये
ज्या कुत्र्यांवर लाखो रुपये खर्च केले जातात ती बहुतांश आयात केली जातात. त्यांचा वारसा म्हणजेच ‘बल्ड लाईन’ चांगला असता. उदा. अर्जेंटियन कॅनल हे गोल्डर रिटिव्हरसाठी प्रसिद्ध असतात. गोल्डन रिटिव्हरसाठी साधारणपणे ३० हजारांपासून ३ लाख रुपयांपर्यंत विकले जाते. भारतीय प्रजातीच्या श्वानांची किंमत पंचवीस हजारांपासून पुढे आहे. ज्यांना ‘डॉग शो’ किंवा ‘ब्रिडिंग’मध्ये अधिक रस आहे, ते लोक तीन लाख रुपयांपर्यंतची कुत्री खरेदी करतात.
चौकट
कुत्र्यांची देखभाल
घरच्या चपाती-भाकरी, दुधावर कुत्री पाळण्याचा काळ केव्हाच मागे पडला. कुत्र्यांसाठी खास ‘डॉग फूड’ दिले जाते. कुत्र्यांसाठीची खास बिस्किटे, पौष्टिक आहारही विकत मिळतो. त्यासाठी महिन्याला ८ ते दहा हजार रुपये खर्च होतो.
चौकट
“माझ्याकडे डॉबरमॅॅन (गोल्डर रिट्रिव्हर) हे कुत्रे असून ते मी दीड लाख रुपयांना खरेदी केले. मला ‘डॉग शो’मध्ये रस असल्याने त्यादृष्टीने त्याचे संगोपन मी करतो. माझं कुत्रं एखाद्या ‘डॉग शो’मध्ये सादर करण्याबरोबरच चांगली ‘ब्ल्ड लाईन’ तयार करण्यासाठीही उपयुक्त ठरू शकते.”
-संदेश तावडे